गर्दीत मास्क वापराच! इन्फ्लुएंझाच्या दोन बळीनंतर केंद्र सरकार खडबडून जागे

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

कोरोना गेल्यामुळे सर्वांनीच सुटकेचा निःश्वास टाकला असताना देशात झपाटय़ाने वाढणाऱ्या ‘इन्फ्लुएंझा’ विषाणूने दोन जणांचा बळी घेतल्यामुळे केंद्रीय आरोग्य यंत्रणा खडबडून जागी झाली आहे. केंद्र सरकारने नीती आयोगासोबत तातडीची बैठक घेतल्यानंतर नीती आयोगाने गर्दीच्या ठिकाणी मास्क वापरण्याचे आवाहन नागरिकांना केले आहे. शिवाय सर्दी, खोकला आणि ताप अशी कोणतीही लक्षणे असल्यास काळजी घ्यावी, असा खबरदारीचा इशाराही नीती आयोगाकडून देण्यात आला आहे.

‘एच3एन2’ इन्फ्लुएंझा वाढत असल्याच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय आरोग्य यंत्रणा अलर्ट मोडवर असून आज नीती आयोगाने कोविड टास्क फोर्स, केंद्रीय आरोग्य सचिव, राज्य आरोग्य अधिकाऱ्यांसोबत महत्त्वपूर्ण बैठक घेतली.

यानंतर केंद्राकडून राज्यांना ‘इन्फ्लुएंझा अलर्ट’ देण्यात आला असून ‘कोरोना प्रोटोकॉल’चे पालन करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. राज्यांनी औषधांचा साठा करून ठेवावा, वाढत्या रुग्णसंख्येवर लक्ष ठेवण्याचे निर्देशही केंद्राकडून राज्यांना देण्यात आले आहेत.

यांनी काळजी घ्यायलाच हवी
इनफ्लुएंझाची लागण कुठल्याही वयाच्या व्यक्तीला होऊ शकते. मात्र या आजाराचा सर्वांत जास्त धोका गर्भवती महिला, पाच वर्षांपेक्षा कमी वयाची मुले, वृद्ध आणि इतर आजारांशी लढणारे रुग्ण यांना जास्त धोका आहे. हा संसर्गजन्य असल्याने एका व्यक्तीपासून दुसऱ्या व्यक्तीला होऊ शकतो.

अशी आहेत लक्षणे
या व्हायरसची लागण झाल्यास 100 अंशांपेक्षा जास्त ताप, खोकला, घशात जळजळ, डोकेदुखी, सर्दी, अंगदुखी, डिहायड्रेशन, श्वास घेण्यास त्रास अशी लक्षणे रुग्णामध्ये आढळतात. यामध्ये दोन आठवडे खोकला राहतो.

राज्याचे आरोग्य खाते मात्र सुशेगाद
राज्याचे आरोग्य खाते मात्र सुशेगाद असल्याचेच चित्र आहे. इन्फ्लुएंझासंदर्भात अजून वरिष्ठ पातळीवर कुठलीही बैठक झाली नसल्याचे सांगण्यात आले. दरम्यान, मुंबईत सध्या तरी इन्फ्लुएंझाचा धोका नसून मुंबईकरांनी घाबरून जाऊ नये असे पालिका प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले. सद्यस्थितीत इन्फ्लुएंझा चाचण्या करण्याच्या गाइडलाइनही मिळालेल्या नाहीत. इन्फ्लुएंझाची कोरोनाप्रमाणेच लक्षणे असून गर्दीच्या ठिकाणी मास्क वापरावा, वारंवार हात धुवावेत आणि सोशल डिस्टन्सिंग पाळावे असे आवाहन मात्र करण्यात आले आहे. शिवाय जास्त दिवस ताप कमी होत नसल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्यावा, असे आवाहनही पालिकेकडूनही करण्यात आले आहे.