लॉकडाऊनमध्ये राज्यात कोविडबाबत 2 लाख 25 हजार गुन्हे दाखल – गृहमंत्री अनिल देशमुख

554
anil-deshmukh

लॉकडाऊन सुरू झाल्यापासून राज्यात आतापर्यंत कोरोनासंदर्भात कलम 188 नुसार 2 लाख 25 हजार गुन्हे दाखल झाले आहेत,अशी माहिती गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिली. राज्यात लॉकडाऊनच्या कालावधीत 22 मार्च ते 9 ऑगस्टपर्यंत कलम 188 नुसार 2, 25, 380 गुन्हे नोंद झाले असून 33,117 व्यक्तींना अटक करण्यात आली, त्यातील विविध गुन्ह्यांसाठी 19 कोटी 88 लाख 5 हजार 354 रुपये दंड आकारण्यात आला. तसेच अत्यावश्यक सेवेसाठी 7 लाख 24 हजार 215 पास पोलीस विभागामार्फत देण्यात आले.

कोरोनाचा मुकाबला करण्यासाठी पोलीस दल, आरोग्य विभाग, डॉक्टर्स, नर्सेस अहोरात्र मेहनत घेत आहेत. मात्र, काही दुष्ट प्रवृत्तीच्या व्यक्ती त्यांच्यावरच हल्ला करीत आहेत. अशा हल्लेखोरांविरुद्ध कडक कारवाई करण्याचे आदेश पोलीस विभागाला देण्यात आले आहेत. या दरम्यान पोलिसांवर हल्ला होण्याच्या 332 घटना घडल्या. त्यात 888 व्यक्तींना ताब्यात घेतले असून पुढील कारवाई सुरू आहे.

100 नंबरवर 1 लाख 9 हजार फोन
पोलीस विभागाचा 100 नंबर हा सर्व जिल्ह्यात 24 तास कार्यरत असतो. लॉकडाऊनच्या काळात या फोनवर एक लाख 9 हजार 793 फोन आले, त्या सर्वांची योग्य ती दखल घेण्यात आली. तसेच राज्यभरात पोलिसांनी ज्यांच्या हातावर क्वॉरंटाइन असा शिक्का आहे अशा 824 व्यक्तींना शोधून त्यांना विलगीकरण कक्षात पाठविले, अशी माहिती देशमुख यांनी दिली. या काळात अवैध वाहतूक करणाऱ्या 1346 वाहनांवर गुन्हे दाखल करण्यात आले. तर 95 हजार 662 वाहने जप्त करण्यात आली.

पोलीस कोरोना कक्ष
कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सुरू असलेल्या प्रयत्नात दुर्दैवाने मुंबईतील 52 पोलीस व 4 अधिकारी अशा एकूण 56, ठाणे शहर 14 व ठाणे ग्रामीण 3 व एक अधिकारी, रायगड 2,पुणे शहर 3, नाशिक शहर 1 ,सोलापूर शहर 3,अमरावती शहर 1 डब्लूपीसी, मुंबई रेल्वे 4, नाशिक ग्रामीण 3,जळगाव ग्रामीण 1,जालना एसआरपीएफ 1 अधिकारी, नवी मुंबई एसआरपीएफ 1अधिकारी , पालघर ग्रामीण 2 व 1 अधिकारी, एटीएस 1, धाराशिव 1, संभाजीनगर शहर 3, जालना 1, नवी मुंबई 2, सातारा 1, नगर 2, संभाजीनगर रेल्वे 1, एसआरपीएफ अमरावती 1, पुणे रेल्वे अधिकारी 1, पीटीएस मरोळ अधिकारी 1, एसआयडी मुंबई 1, नागपूर 2, बीड 1, सोलापूर ग्रामीण 1 अशा 117 पोलिसांचा मृत्यू झाला. पोलिसांना कोरोनाबाबतची काही लक्षणे दिसून आली, तर त्यांच्यावर तातडीने उपचार व्हावेत, यासाठी राज्यात सर्वत्र नियंत्रण कक्ष स्थापन केले आहेत. सध्या 248 पोलीस अधिकारी व 1732 पोलीस कोरोनाबाधित असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

नागरिकाचा सहभाग अपेक्षित
कोरोना विरुद्धच्या लढाईत राज्यातील प्रत्येक नागरिकाचा सहभाग अपेक्षित आहे. तसेच सोशल डिस्टन्सिंग पाळण्याची मोठी जबाबदारी आपल्या सर्वांची आहे. सर्वांनी नियम पाळून सहकार्य करावे, असे आवाहन गृहमंत्र्यांनी केले आहे.

आपली प्रतिक्रिया द्या