राज्यात कोविडबाबतचे 2 लाख 70 हजार गुन्हे दाखल; 28 कोटी 40 लाखांची दंडवसूली – अनिल देशमुख

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
anil-deshmukh

लॉकडाऊन सुरू झाल्यापासून राज्यात आतापर्यंत कोविडबाबत कलम 188 नुसार 2 लाख 70 हजार गुन्हे, तसेच 1347 वाहनांवर अवैध वाहतूकीचे गुन्हे दाखल झाले आहेत. तर 28 कोटी 40 लाख रुपयांची दंड आकारणी करण्यात आली आहे, अशी माहिती गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिली. राज्यात 22 मार्च ते 26 सप्टेंबरपर्यंत कलम 188 नुसार 2,70,571 गुन्हे नोंद झाले असून 37,042 व्यक्तींना अटक करण्यात आली. तर 96,430 वाहने जप्त करण्यात आली. यातील विविध गुन्हांसाठी 28 कोटी 40 लाख 60 हजार 264 रुपयांचा दंड वसूल करण्यात आला, असेही त्यांनी सांगितले.

कोरोनाचा मुकाबला करण्यासाठी पोलीस दल, आरोग्य विभाग, डॉक्टर्स, नर्सेस अहोरात्र मेहनत घेत आहेत. मात्र, काही दुष्ट प्रवृत्ती त्यांच्यावर हल्ला करीत आहेत, अशा हल्लेखोरांविरुद्ध कडक कारवाई करण्याचे आदेश पोलीस विभागाला देण्यात आले आहेत. पोलिसांवर हल्ला होण्याच्या 364 घटना घडल्या आहेत. त्यात 895 व्यक्तींना ताब्यात घेतले असून पुढील कारवाई सुरू आहे.

पोलीस विभागाचा 100 नंबर हा सर्व जिल्ह्यात 24 तास कार्यरत असतो. लॉकडाऊनच्या काळात या फोनवर 1,13,293 फोन आले, त्या सर्वांची योग्य ती दखल घेण्यात आली. या काळात अवैध वाहतूक करणाऱ्या 1347 वाहनांवर गुन्हे दाखल करण्यात आले. तर 96,430 वाहने जप्त करण्यात आली. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सुरू असलेल्या प्रयत्नात राज्यातील 217 पोलीस व 24 अधिकारी अशा एकूण 241पोलीस कर्मचारी/अधिकाऱ्यांचा मृत्यू झाला. पोलिसांना कोरोनाची काही लक्षणे दिसून आली तर त्यांच्यावर तातडीने उपचार व्हावेत, यासाठी राज्यात सर्वत्र नियंत्रण कक्ष स्थापन केले आहेत. कोरोना विरुद्धच्या लढाईत राज्यातील प्रत्येक नागरिकाचा सहभाग अपेक्षित आहे. तसेच सोशल डिस्टन्सिंग पाळण्याची जबाबदारी आपल्या सर्वांची आहे. सर्वांनी नियम पाळून सहकार्य करावे, असे आवाहन गृहमंत्र्यांनी केले आहे.