गोव्यात ‘मगो’ पक्ष भाजपच्या खिशात

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । पणजी

गोव्यात मंगळवारी मध्यरात्र उलटून गेल्यानंतर महाराष्ट्रवादी गोमंतक पार्टीच्या मनोहर आजगावकर आणि दीपक पाऊसकर या दोघा आमदारांनी आपला पक्षच भाजपमध्ये विलीन करून टाकला. त्यामुळे त्या पक्षाचे तिसरे आमदार सुदिन ढवळीकर हे एकाकी पडले असून त्यांच्यासाठी बुधवारचा दिवस त्यांचे उपमुख्यमंत्रीपद हिरावून घेणारा ठरला. त्यांना उपमुख्यमंत्रीपदावरून हटवल्याची घोषणा मुख्यमंत्री प्रदीप सावंत यांनी केली. भाजपने अख्खा ‘मगो’ पक्षच जणू खिशात घातला आहे.

‘मगोप’चे आमदार मनोहर आजगावकर आणि आमदार दीपक पाऊसकर यांनी आपला पक्ष भाजपमध्ये विलीन केल्याचे पत्रच मंगळवारच्या रात्री विधानसभा अध्यक्ष माईक लोबो यांना सादर केले होते. त्या पत्रावर उपमुख्यमंत्री ढवळीकर यांनी सही केली नव्हती.

विलीनीकरणावर शिक्कामोर्तब
पक्षांतर बंदी कायद्याप्रमाणे एखाद्या पक्षातील दोनतृतीयांश आमदार वेगळे होऊन स्वतंत्र पक्षाची स्थापना करत असतील किंवा एखाद्या पक्षात सामील होत असतील तर ते पक्षांतर ठरत नाही. ‘मगोप’ या पक्षाचे आमदार तीनच होते. त्यातील दोघांनी आपला पक्षच भाजपमध्ये विलीन करून टाकला. त्याला विधानसभा अध्यक्ष माईक लोबो यांनी मंजुरी दिली आहे.

भाजप-काँग्रेस संख्याबळ समान
एकूण 36 सदस्य संख्या असलेल्या गोव्याच्या विधानसभेत आता भाजप सदस्यांची संख्या 11 वरून वाढून 14 वर गेली आहे. तर काँग्रेसचेही संख्याबळ 14 इतकेच आहे. ‘मगोप’ हा पक्ष 2012 पासून भाजपचा मित्र पक्ष राहिला आहे.

उपमुख्यमंत्री सुदिन ढवळीकर यांना मंत्रिमंडळातून डच्चू देण्यात आल्यानंतर ‘मगोप’ भाजपमध्ये विलीन करणारे दीपक पाऊसकर यांची आता मंत्रिमंडळात वर्णी लागणार आहे.