टीआरपी प्रकरणात आणखी दोघांना अटक

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

टीआरपी प्रकरणात मुंबई क्राईम ब्रँचने रामजी वर्माला वरळीतून तर दिनेश विश्वकर्माला मुंबई विमानतळावरून अटक केली. त्या दोघांच्या अटकेने आरोपीची संख्या आता आठ झाली आहे. तर बुधवारी रिपब्लिक टीव्हीच्या तिघांना बुधवारी चौकशीसाठी बोलवले आहे.

मुंबई क्राईम ब्रँचने टीआरपी प्रकरणात सहा जणांना अटक केली होती. काही अटक केलेल्या आरोपींच्या चौकशीत हंसाचे माजी कर्मचारी असलेल्या रामजी आणि दिनेशचे नाव समोर आले होते. पोलीस त्या दोघांचा शोध घेत होते. शोध मोहीम सुरु असतानाच रामजी हा वरळी परिसरात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. सीआययु, युनिट 9 आणि प्रॉपर्टी सेलच्या विशेष पथकाने वरळी येथून रामजीला ताब्यात घेऊन अटक केली. रामजी हा हंसाचा माजी कर्मचारी होता. 2013 – 2015 या काळात तो रिलेशनशिप मॅनेजर म्हणून कामाला होता.

टीआरपी प्रकरणात फरार असलेल्या हंसाचा माजी कर्मचारी दिनेश विश्वकर्माचा पोलीस शोध घेत होते. त्याला शोधण्यासाठी पोलिसांचे पथक उत्तर प्रदेशला गेले होते. दिनेश हा वाराणसी येथून मुंबईला येणार असल्याची माहिती क्राईम ब्रँचला मिळाली. मंगळवारी सायंकाळी सीआययु, युनिट 9 आणि प्रॉपर्टी सेलच्या विशेष पथकाने दिनेशला मुंबई विमानतळावरून अटक केली. बुधवारी रामजी आणि दिनेशला आणि अटकेत असलेल्या उमेश मिश्राला न्यायालयात हजर केले जाणार असल्याचे सीआययूचे सहायक पोलीस निरीक्षक सचिन वाझे यांनी सांगितले.

रिपब्लिकच्या तिघांचा जबाब नोंदवणार
बुधवारी रिपब्लिक टीव्हीचे कार्यकारी संपादक निरंजन नारायण स्वामी, सीएफओ शिवा सुब्रमण्यम सुंदरम आणि डिस्ट्रिब्युटरचे प्रमुख घनश्याम सिंगची चौकशी केली जाणार आहे. तर गुरुवारी रिपब्लिकचे टीव्हीच्या सीईओ प्रिया मुखजी यांचा जबाब नोंदवला जाणार आहे. मुंबई क्राईम ब्रँचने एबिक्स कॅशचे एमडी मिलन गणात्रा आणि हंसांचाचे सीईओ प्रवीण निझाराचा जबाब नोंदवला.