रायगड जिल्ह्यातील 20 बंदरे संवेदनशील

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी, अलिबाग

राज्यातील 591 बंदरांपैकी रायगड जिल्ह्यातील 20 बंदरे संवेदनशील असल्याचे नौदलला केलेल्या पाहणीत आढळले आहे. जिल्ह्यातील या 20 बंदरावर कडक सुरक्षा व्यवस्था तैनात करण्याचे मतही नौदलाने नोंदवले आहे. त्यामुळे जिल्ह्यातील या 20 बंदरामार्गे घातपात घडविण्यासाठी प्रयत्न होण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे.

रायगड जिल्ह्यातील श्रीवर्धन तालुक्यातील शेखाडी मार्गे 1991 साली आरडीएक्सचा वापर होऊन मुंबईमध्ये दहशतवादी घातपात झाला होता. तेव्हापासून जिल्ह्यातील बंदराची सुरक्षा धोक्यात आली होती. त्यानंतर पोलीस दलांर्फत जिल्ह्यातील समुद्र किनाऱ्यावर सुरक्षा यंत्रणा तैनात करण्यात आली होती.

समुद्रमार्गे दहशतवादी बोटीमार्गे येऊन अतिरेकी हल्ला झाल्यास राज्यातील आणि विशेषत: रायगड जिल्ह्यातील बंदरे सुरक्षीत आहेत का असा तारांकीत प्रश्न विधान परिषदेमध्ये आमदार धनंजय मुंडे, आमदार अनिकेत तटकरे, आमदार सतिश चव्हाण, आमदार जोगेंद्र कवाडे, आमदार अशोक उर्फ भाई जगताप यांच्यासह अन्यआमदारांनी मुख्यमंत्री याना 12 जून 2019 रोजी विचारला होता. त्याला मुख्यमंत्र्यांनी लेखी उत्तर दिल्यानंतर सदरची बाब उघड झाली आहे.

आमदारांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांनंतर नौदलाने राज्यातील समुद्र किनाऱ्याची पाहणी केली. या पाहणीनंतर राज्यातील 591 बंदरे ही संवेदनशील असल्याचा अहवाल शासनाला सादर केला आहे. यामध्ये रायगड जिल्ह्यातील मांडवा, रेवस, आरसीएफची जुनी जेट्टी, थळ-नवगाव, अलिबाग चौपाटी, रेवदंडा बीच-1, रेवदंडा बिच-2, साळाव, नांदगाव, मुरुड-खोरा, आगरदांडा-1, राजपूरी, दिघी पोर्ट जेट्टी, दिघी पैसेंजर जेट्टी, जिवना बंदर, शेखाडी, बागमांडला, मांदाड, दादर, आंबेत हि बंदरे नौदालाने संवदेनशिल घोषित केली आहेत.

या आधी स्थानिक पोलिस प्रशासन, राज्य गुप्त वार्ता विभाग, कोस्टगार्ड, मत्स्य व्यवसाय विभाग, महाराष्ट्र मेरीटाईम बोर्ड यांच्यासह अन्य कोणत्याच यंत्रणेने यातील काही बंदरे सोडली तर संवेदनशील घोषित केल्याचे दिसून येत नाही. आता नौदलानेच तसा अहवाल दिला असल्याने आणि मुख्यमंत्र्यांनी याबाबतचा उल्लेख केल्याने तेथील बंदरांच्या सुरक्षितततेबाबत गांभीर्याने विचार करण्याची गरज निर्माण झाली आहे.

यात विशेष बाब म्हणजे अलिबाग बीच, मांडवा बंदर, दिघी पोट जेट्टी, दिघी पॅसेंजर जेट्टी यासह अन्य बंदरांवर हजारोंच्या संख्येने नागरिकांची ये-जा असते. त्यामुळे नेमक्या कोणत्या हेतुने सदरची बंदरे संवेदनशील आहेत, याबाबत काहीच उल्लेख केल्याचे दिसून येत नाही. नौदलाने असे कोणते मापदंड लावले होते की त्यामध्ये ही बंदरे संवदेनशील आढळली आहेत, नौदलाने या बंदरांना संवेदनशील बंदराच्या यादीमध्ये टाकले असल्याने स्थानिक सुरक्षा यंत्रणा, पोलीस, कोस्टगार्ड हे नौदलाने दिलेला हा अहवाल किती गांभीर्याने घेतात. हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.