
सामना ऑनलाईन । मुंबई
14 वर्षांच्या अल्पवयीन मुलीवर बलात्कार करून तिचे आक्षेपार्ह फोटो काढणाऱ्या आरोपीला कोर्टाने दणका दिला. याप्रकरणी माटुंगा पोलिसांनी अचूक तपास करून आरोपीविरोधात सबळ पुरावे सादर केले. त्याआधारे कोर्टाने आरोपी तरुणाला 20 वर्षे कैद व 20 हजार दंड अशी शिक्षा सुनावली.
सनी कांबळे (18) असे आरोपी तरुणाचे नाव आहे. सनी मुलीचा पाठलाग करून तिची छेडछाड काढत होता. त्यानंतर कुटुंबीयांना ठार मारण्याची धमकी देऊन सनीने मुलीवर बलात्कार केला होता. तसेच मुलीचे आक्षेपार्ह फोटो काढून तो तिला धमकावत होता. याप्रकरणी 2017 मध्ये माटुंगा पोलीस ठाण्यात सनी कांबळे याच्या विरोधात बलात्कार व ‘पोक्सो’ कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर उपायुक्त अंबिका, एसीपी अस्मिता भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक विनय पाटणकर व पथकाने कसून तपास करीत आरोपीविरोधात सबळ पुरावे जमा केले. ते पुरावे कोर्टात सादर केल्यानंतर शहर सत्र न्यायालयातील पोक्सो केसेस पाहणाऱ्या विशेष न्यायाधीश संचश्री घरत यांनी आरोपी सनी कांबळे याला विविध कलमांन्वये दाखल गुह्यात 20 वर्षे कैद व 20 हजार रुपये दंड अशी शिक्षा सुनावली



























































