हिंदुस्थानी एअर फोर्सने हवेतून हवेत मारा करणाऱ्या 200 स्वदेशी मिसाईल अस्त्र मार्क 1 च्या निर्मितीला मंजुरी दिली. केंद्र सरकारची संस्था डिफेन्स रिसर्च अँड डेव्हलपमेंट ऑर्गनायझेशन (डीआरडीओ) ने याला विकसित केले आहे. या मिसाईलचे निर्माण भारत डायनामिक्स लिमिटेड (बीडीएल) करीत आहे. वायुदलाचे उपप्रमुख मार्शल आशुतोष दीक्षित यांनी हैदराबाद दौऱ्यात बीडीएलच्या उत्पादनाला मंजुरी दिली आहे. संरक्षण अधिग्रहण परिषदद्वारा 2022-23 मध्ये 2900 कोटी रुपयांहून अधिक योजनेसाठी मंजुरी देण्यात आली होती. सर्व चाचणी पूर्ण झाल्यानंतर आता ऑर्डरच्या उत्पादनासाठी मंजुरी देण्यात आली आहे. डीआरडीओकडून अस्त्र मार्क 2 मिसाईलवरही काम केले जात आहे. याची रेंज जवळपास 130 किलोमीटर असेल. तसेच हवेतून हवेत मारा करताना ही 300 किलोमीटरपर्यंत जाईल.
अस्त्र मार्क-1 मिसाईलची खास वैशिष्ट्ये
लढाऊ विमानांकडून जो हवेत मारा केला जातो, त्याला रोखण्याचे काम अस्त्र मार्क-1 मिसाईल करणार आहे. विमान किंवा हेलिकॉप्टरला हवेतच लक्ष्य करण्याचे काम अस्त्र मार्क-1 मिसाईल करणार आहे. हिंदुस्थानला यासारख्या मिसाईलची आवश्यकता होती. अस्त्र मार्क-1 मिसाईल 100 किलोमीटरपर्यंत मारा करण्यात सक्षम आहे. रशियाचे फायटर जेट सुखोई 30 एमकेआय आणि हिंदुस्थानी लढाऊ विमान तेजसला या मिसाईलने खाली पाडता येऊ शकते.