रेडिओ विश्वासवर भरली शाळा; 200 शिक्षक घेताहेत ऑडियो क्लास

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
जिल्हा परिषद शाळेतील 50 हजार विद्यार्थ्यांना फायदा

कोरोना संकटात ‘रेडिओ विश्वास’ हे कम्युनिटी रेडिओ स्टेशन ग्रामीण भागातील विद्यार्थांना शिक्षणाचा आनंद देत आहे. ‘रेडिओ विश्वास’वर ऑडियो क्लासेस सुरू करण्यात आले आहेत. त्यामुळे ज्ञानगंगा गावोगावी पोचली आहे. नाशिकच्या सुमारे 200 शिक्षकांनी वेगवेगळ्या विषयाचा अभ्यासक्रम रेकॉर्ड केला आहे. हा अभ्यासक्रम रेडिओवरून प्रसारित केला जात आहे. याचा लाभ सुमारे 50 हजार विद्यार्थी घेत आहेत.

कोरोनाच्या संकटामुळे मागील वर्षापासून मुलांना ऑनलाईन शिक्षण घ्यावे लागत आहे. स्मार्टफोन आणि इंटरनेटच्या सहाय्याने मुले अभ्यास करत आहेत. मात्र राज्यातील अनेक ग्रामीण, आदिवासी भागातील पालकांकडे मोबाईल, लॅपटॉप नसल्याने मुलांची गैरसोय होते. त्यांच्यासाठी ‘रेडिओ विश्वास’ हे कम्युनिटी रेडिओ स्टेशनने नाशिकमधील जवळपास 200 शिक्षकांच्या मदतीने अभ्यासक्रम रेकॉर्ड करून प्रसारित करत आहे. त्यामुळे ज्यांच्याकडे स्मार्टफोन किंवा इंटरनेट नाही, अशा विद्यार्थ्यांच्या शिक्षणाची सोय झाली आहे. विज्ञान, समाजशास्त्र, गणित व भाषा असे गट तयार करून प्रत्येक गटात आठ-दहा शिक्षक एकत्र आले. त्यांनी अभ्यासक्रम आणि त्याची स्क्रीप्ट तयार करून सादरीकरण केले आहे. या वर्षीही हा ऑनलाईन ऑडियो क्लासेसचा उपक्रम राबवण्यात येत आहे.

जिल्हा परिषदेच्या शाळेने कम्युनिटी रेडिओच्या माध्यमातून शिक्षण संकल्पना कशी अमलात आणली, याची माहिती देताना शिक्षिका सविता हिरामण ठाकरे म्हणाल्या, मी गावात जिल्हा परिषदेच्या शाळेत शिकवते. शाळेतील मुलांची आर्थिक स्थिती चांगली नाही. लॉकडाऊन लागल्यावर या मुलांना शिकवायचे कसे, हा प्रश्न होता. आमच्या केंद्र प्रमुखांनी सर्व शिक्षकांची मीटिंग घेतली. आमच्या पेंद्रातील 500 मुलांना एफएम रेडिओ स्टेशनच्या माध्यमातून शिकवण्याचे ठरवले. आम्ही सर्वांनी अडीच लाख रुपये या उपक्रमासाठी उभे केले.

मुलांना शिकवण्यासाठी प्लॅटफॉर्म उपलब्ध करून दिल्याबद्दल शिक्षक घनश्याम कोळी यांनी आभार मानले. मुले आणि त्यांचे पालक खूश आहेत. आम्हा शिक्षकांनादेखील आनंद वाटत आहे, अशी प्रतिकिया कोळी यांनी दिली. अलीकडेच ‘रेडिओ विश्वास’ला केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्रालयाचा नॅशनल कम्युनिटी रेडिओ पुरस्कार मिळालेला आहे.
जिल्हा परिषदेच्या शाळांतील मुलांकडे स्मार्टफोन नसल्याने त्यांना ऑनलाईन शिक्षण घेण्यात अडचण येत होती. आम्ही ‘रेडिओ विश्वास’च्या माध्यमातून 200 शिक्षकांनी वेगवेगळ्या विषयांवरचे अभ्यासक्रम रेकॉर्डिंग केले आणि ते रेडिओवरून प्रसारित केले. खेडेगावातील, आदिवासी भागातील मुलांनी याचा फायदा झाला. आज सुमारे 50 हजार मुलांनी ऑडियो क्लासेसचा लाभ घेतला आहे.
डॉ. हरी विनायक कुलकर्णी, प्रमुख, रेडिओ विश्वास