
कोरोनाविरोधात नगर जिल्हा परिषदेतील आरोग्य, ग्रामपंचायत, अंगणवाडी, आशा सेविका असे सुमारे 20 हजार कर्मचारी राबत आहेत. जनजागृतीसह नागरिकांचे आरोग्य चांगले राहावे, यासाठी ते प्रयत्न करीत आहेत. जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांच्या मार्गदर्शनाखाली जानेवारीपासून कोरोनाबाबत खबरदारी व उपाययोजना आखण्यात येत आहेत. जिल्हा परिषदेची आरोग्य यंत्रणा प्रशासनाच्या बरोबरीने तेव्हापासून मैदानात उतरली आहे. मार्चमध्ये पहिला कोरोनाबाधित रुग्ण सापडल्यापासून जिल्हा परिषदेतील ग्रामसेवक, अंगणवाडीसेविका, आशा, आरोग्य, गटविकास अधिकारी, विस्तार अधिकारी आदींसह पंचायत समिती व जिल्हा परिषदेतील विविध विभागांतील कर्मचारी उपाययोजना करीत आहेत.
शहरातून मोठ्या संख्येने लोकांचे लोंढे ग्रामीण भागात येत असून आतापर्यंत सुमारे दीड लाख लोकांच्या हातावर ‘होम क्वारंटाईन’चे शिक्के मारले आहेत. हे काम ग्रामपंचायत, अंगणवाडी, आशा कर्मचार्यांनी चोख केले आहे. शाळा, मंगल कार्यालयांत या लोकांची राहण्याची, तसेच जेवणाची व्यवस्था ग्रामसेवक व ग्रामविकास अधिकार्यांनी केली आहे. ग्रामपंचायत कर्मचार्यांमार्फत गावोगाव स्वच्छता ठेवण्यात येत आहे. या कर्मचार्यांनीही आता विमाकवच देण्याची मागणी केली आहे.
कोरोना निर्मूलनासाठी कार्यरत कर्मचारी
- गटविकास अधिकारी-14
- विस्तार अधिकारी-37
- ग्रामसेवक-829
- ग्रामविकास अधिकारी-217
- ग्रामविकास अधिकारी सहायक-4831
- ग्रामपंचायत कर्मचारी-3933
- आपलं सरकार कर्मचारी-898
- अंगणवाडीसेविका- 5291
- मदतनीस-4397
- आशा-3183
- तालुका आरोग्य अधिकारी-14
- जिल्हा आरोग्य अधिकारी,अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी, साथरोग वैद्यकीय अधिकारी, आरोग्यसेविका- 500
- आरोग्य सेवक-250
- सफाई कामगार-42
- औषध निर्माण अधिकारी- 84
- आरोग्य सहायक (पुरुष) – 122
- आरोग्य सहायक (महिला)-90
- आरोग्य पर्यवेक्षक- 12
- प्रयोगशाळा वैज्ञानिक अधिकारी-11
- कुष्ठरोग तंत्रज्ञ, वैद्यकीय अधिकारी गट अ/ब- 206
































































