इमारतींमध्येही दिलासा; 15 दिवसांत 2 हजार ठिकाणचे निर्बंध उठवले!

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मुंबईत रुग्ण दुपटीच्या कालावधीने दीडशे दिवसांचा टप्पा ओलांडला असताना आता इमारतींमध्ये वाढणारा धोकाही कमी होत असल्याचे आशादायक चित्र समोर आले आहे. यामध्ये गेल्या 15 दिवसांत तब्बल 2002 ठिकाणचे निर्बंध उठवण्यात आले आहेत. शिवाय चाळी-झोपडपट्ट्यांमध्येही कोरोना आटोक्यात आला असून 23 कंटेनमेंट झोनची नियमांच्या कचाटय़ातून सुटका करण्यात आली आहे. पालिकेने ‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी’ मोहिमेत नियमांची कठोर अंमलबजावणी आणि प्रभावी उपाययोजना केल्यामुळेच हे यश येत आहे.

कोरोना रोखण्यासाठी बाधित रुग्ण आढळणारी ठिकाणे पालिकेच्या माध्यमातून कंटेनमेंट झोन म्हणून जाहीर करून कठोर नियमांची अंमलबजावणी करण्यात येत आहे. यामध्ये दहा पेक्षा जास्त रुग्ण आढळल्यास संपूर्ण इमारत सील करण्याचा निर्णयही घेण्यात आला आहे. दरम्यान, ऑगस्टअखेर सुरू झालेली रुग्णवाढ संपूर्ण सप्टेंबर आणि ऑक्टोबरच्या सुरुवातीपर्यंत कायम राहिल्याने पालिकेसमोर आव्हान वाढले होते.

विशेष म्हणजे चाळी-झोपडपट्ट्यांपेक्षा इमारतींमध्ये कोरोनाबाधित जास्त रुग्ण वाढू लागल्याने आणि लॉकडाऊन आणखी शिथील झाल्यामुळे रुग्णवाढ कशी रोखणार असा प्रश्न पालिकेसमोर निर्माण झाला होता. मात्र मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या संकल्पनेतून ‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी’ ही मोहीम प्रभावीपणे राबवल्यामुळे कोरोना नियंत्रणात येत आहे. घरोघरी तपासणी, सर्वेक्षण, जनजागृती आणि प्रभावी उपाययोजनांमुळे आता इमारतींमध्येही रुग्णसंख्या घटल्याने सील इमारतींची संख्याही झपाटय़ाने कमी होत आहे.

अशी झाली घट
मुंबईत 15 ऑक्टोबर रोजी 9 हजार 459 सील इमारती होत्या. तर झोपडपट्ट्या चाळींमध्ये 632 कंटेनमेंट झोन होते. यामध्ये घट होऊन 23 ऑक्टोबर रोजी सील इमारतींची संख्या 8518 तर कंटेनमेंट झोनची संख्या 620 पर्यंत खाली आली. ही घट कायम राहत 30 ऑक्टोबर रोजी यामध्ये आणखी घट होऊन सील इमारतींची संख्या 7457 तर कंटेनमेंट झोनची संख्या 609 पर्यंत खाली आली.

मुंबईत चाचण्यांची संख्या 15 लाखांवर
मुंबईत पालिकेच्या माध्यमातून दररोज होणाऱ्या चाचण्या वाढल्याने जास्तीत जास्त रुग्ण शोधले गेले. यामध्ये चाचण्यांची संख्या सात हजारांवरून थेट 15 ते 18 हजारांपर्यंत प्रतिदिन वाढवण्यात आली. आढळलेले रुग्ण आणि हायरिस्क संशयितांबाबत प्रभावी उपाययोजना केल्यामुळे रुग्णसंख्या घटत आहेत. 30 ऑक्टोबरपर्यंत मुंबईत एकूण चाचण्यांची संख्या 15 लाख 13 हजार 154 झाली आहे.