निम्मा महाराष्ट्र दुष्काळाच्या छायेत, 201 तालुक्यांत सलग 21 दिवस पाऊसच नाही

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन, मुंबई

राज्यातून पावसाने माघार घेतल्यामुळे राज्यात अनेक भागांत एकीकडे पाणीटंचाई निर्माण होण्याची चिन्हे असताना दुसरीकडे राज्यातील तब्बल 201 तालुक्यांमध्ये सलग 21 दिवस पाऊस पडला नसल्याचे आज स्पष्ट झाले आहे. राज्यातल्या निम्म्यापेक्षा अधिक तालुक्यांमध्ये पावसाने पाठ फिरवल्यामुळे महाराष्ट्रावर दुष्काळाचे सावट निर्माण होण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे

राज्यातील विविध तालुक्यांतील पर्जन्यमान, पीक परिस्थिती, भूजल पातळी आदींची माहिती एकत्रित करून त्याचे विश्लेषण करण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाची मदत घेऊन मदत व पुनर्वसन विभागाने ‘महा मदत’ या नवीन वेबसाइट व ऍपची निर्मिती केली आहे. या वेबसाइटचे उद्घाटन महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते झाले.

यावेळी बोलताना चंद्रकात पाटील म्हणाले की, केंद्र शासनाच्या दुष्काळविषयक पहिल्या निकषानुसार राज्यातील 201 तालुक्यांमध्ये सलग 21 दिवस पाऊस पडलेला नाही. तसेच दुसऱ्या निकषाची पाहणी लवकरच पूर्ण होऊन सोमवारपर्यंत अहवाल येईल. त्यानंतर या दोन्ही निकषांचे अहवाल आल्यावर संबंधित तालुक्यांत दुष्काळसदृश परिस्थिती जाहीर करून तातडीने विविध उपाययोजना करण्यात येतील. त्यानंतर जिल्हाधिकारी स्तरावर 25 ऑक्टोबरपर्यंत प्रत्यक्ष पाहणी करून दुष्काळी तालुके जाहीर करण्यासाठी केंद्र शासनाकडे अहवाल पाठविण्यात येईल.