
राज्यातील धरणांमधील पाणीसाठा झपाट्याने खालावत चालला असून मागील वर्षीच्या तुलनेत या वर्षी पाण्याची पातळी २३ टक्क्यांनी खालावली आहे. मंगळवारी राज्यातील ३ हजार ४२ धरणांमध्ये ९६६.६१ टीएमसी म्हणजेच ६७ टक्के उपयुक्त पाणीसाठा शिल्लक आहे. गेल्या वर्षी याच दिवशी तो ९० टक्के होता. विशेषतः मराठवाड्यातील धरणांची स्थिती गंभीर असून, काही जिल्ह्यांमध्ये पाणीसाठा दहा टक्क्यांपेक्षा खाली आला आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील जनतेच्या तोंडचे पाणी पळाले आहे. जलसंपदा विभागाने आजच्या मंत्रिमंडळ बैठकीसमोर सादर केलेल्या अहवालातून पाण्याची स्थिती दिवसेंदिवस गंभीर होत असल्याचे स्पष्ट झाले आहे.
राज्यातील १३८ मोठ्या धरणांमध्ये ७६२.३९ टीएमसी (७४ टक्के), २६६ मध्यम धरणांमध्ये १२०.८६ टीएमसी (५९ टक्के), तर २ हजार ६३८ लघुप्रकल्पांमध्ये ८३.३५ टीएमसी (३८ टक्के) पाणीसाठा आहे. गतवर्षी मोठ्या धरणांमध्ये ९७ टक्के, मध्यम धरणांमध्ये ८२ टक्के आणि लघुप्रकल्पांमध्ये ६६ टक्के पाणीसाठा होता. महसूल विभागनिहाय विचार करता कोकण विभागात सर्वाधिक ८४ टक्के, पुणे विभागात ७७ टक्के आणि नाशिक विभागात ७६ टक्के पाणीसाठा आहे. नागपूर विभागात ५९ टक्के, अमरावती विभागात ५५ टक्के, तर छत्रपती संभाजीनगर विभागात सर्वात कमी ३९ टक्के पाणीसाठा आहे. छत्रपती संभाजीनगर विभागातील परिस्थिती विशेष चिंताजनक आहे. राज्यातील प्रमुख धरणांपैकी गोसीखुर्द धरण पूर्ण क्षमतेने भरले असून, भंडारदरा धरणात ९२ टक्के, कोयना धरणात ८२ टक्के, तर उजनी धरणात ६७ टक्के पाणीसाठा आहे. मात्र, गेल्या वर्षी याच दिवशी जायकवाडी आणि उजनी धरणे पूर्ण क्षमतेने भरलेली होती. यंदा जायकवाडीत ७२ टक्के, तर उजनीत ६७ टक्के पाणीसाठा आहे.
मुंबईतील धरणांमध्ये ८८ टक्के पाणीसाठा मुंबई आणि ठाणे महानगरपालिकांना पाणीपुरवठा करणाऱ्या सहा प्रमुख धरणांमध्ये एकत्रित ८८ टक्के पाणीसाठा आहे. गतवर्षी याच दिवशी हा साठा ९७ टक्के होता. त्यामुळे मुंबई महानगर प्रदेशातील पाणीसाठ्यातही नऊ टक्क्यांची घट नोंदविण्यात आली आहे.



























































