अमेरिकेत शाळेमध्ये भीषण गोळीबार, 21 जणांना गोळ्या घालून केले ठार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

भीषण गोळीबारामुळे अमेरिकेतील टेक्सास शहर हादरून गेले आहे. अमेरिकेच्या टेक्सास मधील एका प्राथमिक शाळेत मंगळवारी झालेल्या गोळीबारात 18 विद्यार्थ्यांसह 21 जणांचा मृत्यू झाला. मृतांमध्ये शिक्षक आणि दोन तरुणांचा देखील समावेश आहे. यावेळी पोलिसांनी हल्लेखोर 18 वर्षीय बंदूकधारी व्यक्तीलाही ठार केले. टेक्सासच्या सॅन अँटोनियोच्या पश्चिमेला सुमारे 85 मैलांवर असलेल्या उवाल्डे येथील रॉब एलिमेंटरी स्कूलमध्ये ही धक्कादायक घटना घडली.

गव्हर्नर ग्रेग एबॉट यांनी सांगितले की बंदूकधारी हल्लेखोर व्यक्तीचे नाव साल्वाडोर रामोस असे असून तो त्याच भागातील रहिवासी आहे. हल्लेखोर व्यक्ती रायफल घेऊन शाळेत घुसला आणि गोळीबार करण्यास सुरुवात केली. 2012 मध्ये सँडी हूक एलिमेंटरी स्कूलमध्ये देखील अशीच घटना घडली होती. मात्र हा हल्ला अधिक प्राणघातक असल्याचे एबॉट म्हणाले. टेक्सास मधील उवाल्डे हे 20 हजार पेक्षा कमी लोकसंख्या असलेले शहर आहे. मेक्सिकोच्या सीमेपासून सुमारे एक तासाच्या अंतरावर हे छोटे शहर आहे.

या घटनेविषयी शोक व्यक्त करताना अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बिडेन म्हणाले की जगात इतरत्र कुठेही गोळीबारा सारखा प्रकार हा क्वचितच घडतो. आपण या नरसंहारासोबत जगायला का तयार आहोत? आपण असे का होऊ देत आहोत? या वेदना आता कृतीत उतरवण्याची वेळ आली आहे. काही पालकांना आपल्या मुलांना पुन्हा कधीही पाहता येणार नाही. त्या पालकांनी कधी असा विचार देखील केला नसेल. मूल गमावण्याची भावना म्हणजे तुमच्या आत्म्याचा तुकडा कायमचा फाडून टाकल्यासारखे आहे. मी प्रार्थना करतो की त्यांना हे दुःख सहन करण्याची शक्ती मिळो.

फ्लोरिडाच्या पार्कलँड येथे हल्ल्यात 2018 मध्ये 14 विद्यार्थी आणि तीन प्रौढ कर्मचार्‍यांचा मृत्यू झाला होता. तर 2012 मध्ये कनेक्टिकटमधील सँडी हुक येथील गोळीबारात 20 शाळकरी मुले आणि सहा कर्मचारी मारले गेले होते.