तारकर्लीत कोब्राची तब्बल 22 पिल्ले सापडली!

1810

मालवण तालुक्यात तारकर्ली येथे बुधवारी सायंकाळी एकाच ठिकाणी कोब्रा जातीची तब्बल 22 पिल्ले आढळून आली आहेत. राज्यात एकाच ठिकाणी एवढ्या मोठ्या संख्येने पिल्ले आढळणे हा एक विक्रम असल्याचे मानले जात आहे. वाईल्ड लाईफ इमर्जन्सी रेस्क्यू सिंधुदुर्ग या संस्थेच्या कार्यकर्त्यांनी या पिल्लांची सुटका करून त्यांना वनविभागाकडे सुपूर्द केले. नंतर या पिल्लाना नैसर्गिक अधिवासात सोडण्यात आले.

तारकर्लीत बुधवारी सायंकाळी प्रवीण मयेकर यांच्या गणेशमूर्ती शाळेत सापाचे पिल्लू दिसल्याचा फोन वाईल्ड लाईफ इमर्जन्सी रेस्क्यू टीमचे उपाध्यक्ष आनंद बांबर्डेकर यांना आला. त्यानंतर त्यांच्या टीमचे कार्यकर्ते गणेशमूर्ती शाळेत गेले. त्यांनी शोध घेतला असता कोब्राचं एक पिल्लू त्यांना आढळले. त्याची सुटका बांबर्डेकर यांनी केली. त्यानंतर काही वेळातच दुसरे पिल्लू दिसले, मग तिसरे अशी तब्बल कोब्राची 22 पिल्ले आढळून आली आहेत. याबाबतची माहिती मिळताच वाईल्ड लाईफ इमर्जन्सी रेस्क्यू टीमचे अध्यक्ष अनिल गावडे, सचिव वैभव अमृस्कर, नंदू कुपकर, महेश राऊळ हे तेथे पोहोचले. सापडलेल्या या पिल्लांना वाईल्ड लाईफ इमर्जन्सी रेस्क्यू सिंधुदुर्गच्या टीमने वनविभागाच्या ताब्यात दिले. नंतर या पिल्लाना नैसर्गिक अधिवासात सोडण्यात आले.

आतापर्यंत कोब्रा जातीची एकाच ठिकाणी जास्तीजास्त 13 ते 14 पिल्लेच आढळल्याची नोंद आहे. त्यामुळे एकाच ठिकाणी कोब्राची 22 पिल्ले सापडणे हा राज्यातील विक्रम असल्याचे वाईल्ड लाईफ संस्थेचे अध्यक्ष अनिल गावडे यांनी सांगितले.

आपली प्रतिक्रिया द्या