राज्यव्यापी संपात २२ हजार ग्रामसेवक सहभागी होणार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी। नगर

सहाव्या वेतन आयोगातील वेतनत्रुटी सुधारणांची अंमलबजावणी करून केंद्र शासनाप्रमाणे सातवा वेतन आयोग लागू करावा, अंशदायी पेन्शन योजना रद्द करून जुनी पेन्शन योजना लागू करावी यासह विविध मागण्यांसाठी राज्य सरकार, जिल्हा परिषद कर्मचारी महासंघासह विविध शासकीय, निमशासकीय कर्मचारी संघटनांनी ७ ते ९ ऑगस्ट दरम्यान तीन दिवसीय संपाचा इशारा दिला आहे. या संपात राज्यातील २२ हजार ग्रामसेवक, ग्रामविकास अधिकारी सहभागी होणार आहेत, अशी माहिती महाराष्ट्र राज्य ग्रामसेवक युनियनचे राज्य अध्यक्ष एकनाथ ढाकणे व राज्य सरचिटणीस प्रशांत जामोदे यांनी दिली आहे.

याबाबत प्रसिध्दीस दिलेल्या पत्रकात राज्य अध्यक्ष ढाकणे यांनी म्हटले आहे की, संघटनेच्यावतीने मुख्यमंत्र्यांना नुकतेच विविध मागण्यांचे निवेदन देण्यात आले आहे. २०१७ मध्ये जानेवारी व जुलै या महिन्यात झालेल्या संपातील मागण्यांवर तोडगा निघालेला नाही. सरकारी कर्मचार्‍यांनी डिसेंबर २०१७ मध्ये मंत्रालयावर महामोर्चा काढला. तसेच यावर्षी १२ जून रोजी निदर्शने करण्यात आली. पण शासनाकडून अद्याप सकारात्मक प्रतिसाद मिळालेला नाही. यामुळे आता ७ ते ९ ऑगस्ट दरम्यान राज्यव्यापी संप केला जाणार आहे. सरकारी कर्मचार्‍यांच्या या संपात राज्यभरातील २२ हजार ग्रामसेवक सहभागी होणार आहेत. जुनी पेन्शन योजना, सातवा वेतन आयोग लागू करावा, खासगीकरण व कंत्राटी धोरण रद्द करावे, कंत्राटी कर्मचार्‍यांना किमान वेतन २६ हजार रुपये द्यावे, महागाई भत्त्याची थकबाकी त्वरित अदा करावी, राज्य सरकारी कर्मचार्‍यांचे सेवानिवृत्तीचे वय ६० वर्षे करावे, कामकाजासाठी पाच दिवसांचा आठवडा करावा, ग्रामसेवकपदासाठी शैक्षणिक अर्हता पदवीधर करावी आदी मागण्या संपकाळात मांडण्यात येणार असल्याचे ढाकणे यांनी सांगितले आहे.

summery… 22 thousand gramsevek will participate in strike