
महाराष्ट्रातील 18-19 वर्षे वयोगटातील 45.79 लाख नवतरुणांच्या संख्येपैकी 10.18 लाख तरुणांनी म्हणजेच 22% तरुणांनी मतदार म्हणून नोंदणी केली आहे, असं मंगळवारी प्रसिद्ध झालेल्या अंतिम मतदार यादीत दिसून आलं.
विशेष म्हणजे गेल्या वर्षीच्या तुलनेत तरुण मतदारांच्या नोंदणीत चांगलीच वाढ झाल्याचं दिसत आहे. ऑक्टोबरमध्ये मसुदा यादी प्रसिद्ध झाली तेव्हा या वयोगटातील केवळ 3.48 लाख तरुणांनी मतदार म्हणून नोंदणी केली होती हे लक्षात घेता ही लक्षणीय वाढ आहे, अशी माहिती निवडणूक अधिकाऱ्यांनी दिली.
निवडणूक आयोगाच्या मोहिमेनंतर या वयोगटातील 6.7 लाख मतदारांची भर पडल्याचं अधिकाऱ्यांनी नमूद केलं. मसुदा यादीत फक्त 7% तरुणांनी मतदार म्हणून नोंदणी केली होती.
जवळपास सर्व निवडणुकांमध्ये तरुण मतदारांची संख्या कमी पाहायला मिळाला आहे. 2014 आणि 2019 च्या निवडणुका पाहिल्या तरी या वयोगटातील तरुणांची नोंदणी कमीच दिसते. ‘यावेळी चालवलेल्या मोहिमेमुळे नक्कीच चांगली सुधारणा झाली आहे’ राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे यांनी दिल्याचं टाइम्सच्या वृत्तात म्हटलं आहे.
‘मंगळवारी प्रकाशित झालेली अंतिम मतदार यादी राज्यातील युवा मतदारांच्या संख्येत सातत्याने सुधारणा दर्शवते, जे निवडणूक प्रक्रियेप्रती तरुण मतदारांची बांधिलकी दर्शवते’, असं ते म्हणाले.
अद्याप, 78% तरुण मतदारांनी नोंदणी करणे बाकी आहे आणि ते आता करू शकतात कारण नोंदणी मोहीम सुरू राहणार आहे. उमेदवारी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवसाच्या 10 दिवस अगोदरपर्यंत ही मोहीम सुरू राहणार असल्याचं देशपांडे यांनी सांगितल्याचं वृत्तात म्हटलं आहे.





























































