22 हजार कामगार कामावर आले; संपकऱयांना ‘मेस्मा’ लागणार? आजच्या बैठकीत निर्णय होणार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सरकारचे दायित्व जसे कर्मचाऱयांशी आहे तसे ते जनतेशीदेखील आहे. त्यामुळे एसटी कर्मचाऱयांनी संप मागे घेऊन कामावर हजर व्हावे. आतापर्यंत एसटीचे 22 हजार कर्मचारी कामावर हजर झाले असल्याचे सांगताना परिवहनमंत्री अनिल परब यांनी कामावर रुजू न होणाऱया कर्मचाऱयांना ‘मेस्मा’ लावण्याबाबत उद्या शुक्रवारी होणाऱया बैठकीत निर्णय घेतला जाईल, अशी माहिती दिली.

  रत्नागिरी दौऱयावर असलेले अनिल परब यांनी एसटी संपाबाबत पत्रकारांच्या प्रश्नांना उत्तरे दिली. ते म्हणाले, कामावर न परतलेल्या 10 हजार कर्मचाऱयांचे आतापर्यंत निलंबन झाले आहे. अडीच हजार कंत्राटी कर्मचाऱयांची सेवा समाप्त करण्यात आली. उद्या होणाऱया बैठकीत ‘मेस्मा’ लावण्याबाबत निर्णय घेतला जाईल.  कर्मचारी कामावर परतत आहेत. कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रात वाहतूक बऱयापैकी सुरू झाली आहे. विदर्भ आणि मराठवाडय़ातील वाहतूक सुरू झालेली नाही. आतापर्यंत 10 हजार कर्मचाऱयांचे निलंबन झाले असून निलंबनाची कारवाई बडतर्फीच्या दिशेने जाऊ शकते तर अडीच हजार कंत्राटी कर्मचाऱयांची सेवा समाप्त झाली आहे.

कर्मचाऱयांची दिशाभूल केली जात आहे

 एसटी कर्मचाऱयांची दिशाभूल केली जात आहे. 20 डिसेंबर रोजी एसटीचे विलीनीकरण करून देतो असे सांगितले जात आहे, मात्र  यात कर्मचाऱयांचेच नुकसान होत आहे. आम्ही वारंवार एसटी कर्मचाऱयांना आवाहन करतोय की, तुम्ही पुन्हा कामावर या, असे अनिल परब यांनी स्पष्ट केले.