25 कोटींची खंडणी प्रकरण; समीर वानखेडे यांच्या याचिकेवरील सुनावणी 5 सप्टेंबरपर्यंत तहकूब

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

अभिनेता शाहरुख खानकडून 25 कोटींची खंडणी मागितल्या प्रकरणात मुंबई एनसीबीचे माजी विभागीय अधिकारी समीर वानखेडे यांना उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. या याचिकेवरील सुनावणी 5 सप्टेंबरपर्यंत तहकूब करण्यात आली आहे. या प्रकरणात सॉलिसिटर जनरल तुषार मेहता हे सीबीआयकडून युक्तीवाद करण्यासाठी येणार आहेत, अशी माहिती मिळाली आहे.

वानखेडे यांना अंतरिम संरक्षण न देता त्यांची याचिका फेटाळण्याची जोरदार मागणी याआधी सीबीआयनं केली. त्यावर न्यायालयाने सीबीआयला केस डायरी सादर करण्याचे आदेश देत सुनावणी पुढे ढकलली होती. आज याचिकेवरील सुनावणी 5 सप्टेंबरपर्यंत तहकूब करण्यात आली आहे.

कॉर्डिलिया क्रूझ ड्रग्ज पार्टी प्रकरणात आर्यन खानला सोडून देण्यासाठी समीर वानखेडे यांनी शाहरुख खानकडे 25 कोटींची खंडणी मागितल्याचा आरोप आहे. या प्रकरणी सीबीआयने वानखेडे यांच्याविरुद्ध खंडणीचा गुन्हा दाखल केला. त्यानंतर डोक्यावर अटकेची टांगती तलवार उभी राहिल्यामुळे वानखेडे यांनी गुन्हा रद्द करण्याची विनंती करत उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे.