
हिंदुस्थानसह जगात गुजरातच्या सुरतमध्ये हिरे उद्योग मोठ्या प्रमाणात सुरू असतो. मात्र दोन वर्षांत कोरोनाचा फटका आणि त्यानंतर रशिया युक्रेन युद्धांमुळे या उद्योगाला जमीनदोस्त केले आहे. रशियन हिऱ्यांची आयात थांबल्याने देशात कच्च्या हिऱ्यांची आयात 29 टक्क्यांनी घटली आहे. परिणामी गुजरातचे 25 हजार हिरे कारागीर बेरोजगार झाले आहेत. काम कमी झाल्याने साप्ताहिक सुट्या दोन आणि कामांचे तास 8 वरून 6 केले आहेत. यामुळे बेरोजगारीचे मोठे संकट उभे राहण्याची शक्यता नाकारता येत नाही.
देशात कोरोनामुळे अनेक उद्योग ठप्प झाले आहे. यातच गुजरातचा हिरे उद्योग रशियाच्या युद्धामुळे थंडावला आहे. देशात रशियातून वार्षिक 75 हजार कोटी रुपयांचे कच्चे हिरे आयात केले जात होते. यातील बहुतांश साठा पातळ हिऱ्यांचा होता. अशा प्रकारचा हिरा जगातील इतर कोणत्याही देशात सापडत नव्हता. मात्र, यावर आता अमेरिकेची मोहोर लागली आहे. म्हणजेच रशियन हिरा खरेदी-विक्री करणारे देश अमेरिकेसोबत व्यापार करू शकणार नाहीत. जेम्स अँड ज्वेलरी एक्स्पोर्ट प्रमोशन कौन्सिलचे प्रादेशिक अध्यक्ष दिनेश नावडिया म्हणाले, रशिया-युक्रेन युद्धामुळे गुजरातचे 25 हजारांपेक्षा जास्त हिरे कारागीर बेरोजगार झाले आहेत. सुरतशिवाय उत्तर गुजरात आणि सौराष्ट्रातही मोठ्या प्रमाणात रशियन हिरे पॉलिश होतात. नावडिया म्हणाले, आतापर्यंत जुना साठा वापरात होता, पण तोही आता संपत आहे. रशियातील हिरे आयात अशीच ठप्प राहिली तर हिरे कारखानेही बंद व्हायला लागतील. मे 2021 च्या तुलनेत सिंथेटिक डायमंडचे काम आठपट वाढले.
अमेरिका सर्वात मोठी बाजारपेठ, हिंदुस्थानची मोठी भागीदारी
हिंदुस्थानात तयार होणाऱ्या पॉलिश्ड हिऱ्यांपैकी तीन चतुर्थांशपेक्षा जास्त हिरे अमेरिका, यूएई आणि हाँगकाँगला निर्यात केले जातात. जगामध्ये अमेरिका ही हिऱ्यांची सर्वात मोठी बाजारपेठ आहे. कोरोनाकाळातही येथील हिऱ्यांना सर्वाधिक मागणी होती. अशा वेळी हिरे उद्योजक अमेरिकेला नाराज करू इच्छित नाहीत. त्यामुळे हे युद्ध कधी थांबेल याकडे सर्व जगाचे लक्ष लागले आहे.





























































