26 जानेवारीच्या संचलनात दिसणार ‘राफेल’ची झलक!

595

प्रजासत्ताक दिनाला अवघे काही तास उरले आहेत. संपूर्ण देशात प्रजासत्ताक दिनानिमित्त उत्साहाचं वातावरण आहे. दरवर्षीप्रमाणे यंदाही प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने होणाऱ्या संचलनाकडे तमाम हिंदुस्थानींचं लक्ष लागून राहिलं आहे. कारण, यंदा या संचलनात अनेक गोष्टी पहिल्यांदाच घडणार आहेत. त्यात राफेल या लढाऊ विमानाचाही समावेश असणार आहे.

यंदाच्या प्रजासत्ताक दिनाच्या संचलनात प्रथमच हिंदुस्थानी हवाई दलाच्या पथकात राफेलची झलक पाहायला मिळणार आहे. शत्रुच्या हृदयात धडकी भरवणारं हे लढाऊ विमान अनेक आधुनिक शस्त्रास्त्रांनी सुसज्ज आहे. वॉर्निंग रिसिव्हर, लो लँड जॅमर, दहा तासांपर्यंत डेटा रेकॉर्डिंग, इन्फ्रारेड सर्च, ट्रॅकिंग सिस्टिम अशा अनेक अत्याधुनिक यंत्रणा राफेलमध्ये आहेत. याची रडार यंत्रणा 100 किमी परिसरात एकाच वेळी 40 लक्ष्यांना भेदू शकते. त्यामुळे हे लढाऊ विमान पाहणं ही पर्वणी असणार आहे.

या खेरीज ‘मिशन शक्ती’अंतर्गत प्रक्षेपित करण्यात आलेलं आणि अवकाशात शत्रुच्या उपग्रहांना नष्ट करू शकणारं अँटी सॅटेलाईट क्षेपणास्त्रही या संचलनात पाहायला मिळेल. दर पाच सेकंदांमध्ये शत्रुवर तोफगोळे फेकू शकणारी स्वयंचलित सारंग तोफही या संचलनात दिसणार आहे. त्याखेरीज रात्रीच्या वेळीही उडू शकणारं अपाचे आणि दुर्गम भागात शस्त्रास्त्रांची ने-आण करणारं चिनूक ही दोन्ही लढाऊ हेलिकॉप्टर्सही या संचलनात दिसतील. स्वदेशी विमान वाहक युद्धनौकेची प्रतिकृतीही संचलनात दिसेल. तसंच, संपूर्ण स्वदेशी बनावटीचं ध्रुव हे लाइट कॉम्बॅट हेलिकॉप्टरही प्रथमच संचलनाचा हिस्सा असेल.

29 सप्टेंबर 2016 रोजी पाकव्याप्त कश्मीरमध्ये घुसून सर्जिकल स्ट्राईक करणारं आणि दहशतवाद्यांचे तळ उद्ध्वस्त करणारं पॅराकमांडोंचं पथकही प्रथमच या संचलनात सहभागी होणार आहे. या संचलनावेळी प्रथमच रासायनिक, जैविक, रेडिओलहरी किंवा अणुहल्ल्यापासून संरक्षण करणारे सीबीआरएन नावाचे खास गणवेश घालणार आहेत.

यंदा संचलनात प्रथमच हिंदुस्थानी सैन्याच्या तुकडीचं नेतृत्व एका महिलेकडे असणार आहे. कॉर्प्स ऑफ सिग्नल्स पथकाच्या कॅप्टन तान्या शेरगिल यंदा ही कमान सांभाळत आहेत. तसंच सीआरपीएफचं महिला बटालियन खतरनाक बाईक स्टंट्स करताना दिसणार आहे.

आपली प्रतिक्रिया द्या