
झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाने (एसआरए) स्वच्छता अभियानाअंतर्गत 26 टन रद्दी जमा केली असून ही रद्दी आपल्या वांद्रे पूर्व येथील मुख्यालयाबाहेर रचून ठेवली आहे. मात्र, विकेंडला पडलेल्या मान्सून पूर्व पावसामुळे या रद्दीचा लगदा झाला आहे. सध्या ही रद्दी ताडपत्रीने झाकली असली तरी ती पूर्णपणे झाकलेली नाही. त्यामुळे वेळीच निविदा काढून ही रद्दी विकली नाही तर रद्दीच्या विक्रीतून मिळणाऱया लाखो रुपयांच्या महसुलावर एसआरएला पाणी सोडावे लागणार आहे.
राज्य शासनाच्या शंभर दिवसांच्या कृती आराखडय़ाअंतर्गत एसआरएने मुख्यालयात स्वच्छता अभियान राबवले होते. त्याअंतर्गत जूने आणि कालबाह्य झालेले कॉम्प्युटर, टेबल, खुर्च्या आणि कपाटे यांची विल्हेवाट लावण्यात आली. तसेच कार्यालयातील वर्षानुवर्षे पडलेल्या फायलींचे आवश्यकतेनुसार अ, ब, क, ड असे वर्गीकरण करण्यात आले आहे. त्यापैकी अनावश्यक असलेली कागदपत्रे रद्दीत टाकण्यात आली आहे. सध्या जमा झालेली 26 टन रद्दी एसआरए प्राधिकरणाने वांद्रे पूर्व येथील मुख्यालयाबाहेर रचून ठेवली आहे. येत्या काही दिवसांत या रद्दीच्या विक्रीसाठी प्राधिकरणाकडून टेंडर काढण्यात येणार आहे. मात्र पावसाच्या पाण्यामुळे रद्दी खराब झाल्यास एसआरएचा लाखो रुपयांचा महसूल बुडणार आहे.




























































