नापिकी व कर्जबाजारीपणाला कंटाळून तरुण शेतकऱ्याने मृत्यूला कवटाळले

51

सामना प्रतिनिधी । वसमत

वसमत तालुक्यातील खांडेगाव येथील एका 26 वर्षीय तरुण शेतकऱ्याने सततच्या नापिकी व कर्जबाजारीपणाला कंटाळून विषारी औषध प्राशन करुन आत्महत्या केल्याची घटना शनिवारी रात्री घडली. हा प्रकार रविवारी सकाळी उघडकीस आला असून वसमत ग्रामीण पोलीस ठाण्यात आकस्मीक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, वसमत तालुक्यातील खांडेगाव येथील तरुण शेतकरी रामा गोपीनाथ कुसळे (26) हा घरातील कर्ता पुरुष होता. वडिलांच्या नावे तीन एकर शेती असून त्यांचे नावे बँकेचे पाच लाख रुपयांचे पीककर्ज होते. रामा कुसळे यांच्याकडे महिंद्रा फायनान्सचे एक लाख रुपये कर्ज होते. सदरील कर्ज कसे फेडावे या चिंतेत शेतकरी कुसळे यांनी खांडेगाव शिवारातील स्वत:च्या शेतात शनिवारी रात्री विषारी औषध प्राशन करुन आत्महत्या केली. सदरील बाब रविवारी सकाळी 9 वाजता उघडकीस आली.

या घटनेची माहिती मयत रामा कुसळे यांचे वडील गोपीनाथ रामजी मुसळे यांनी वसमत ग्रामीण पोलिसांना कळविली. त्यानंतर सहायक पोलीस निरीक्षक बळीराम बंदखडके यांच्यासह जमादार निवृत्ती बडे यांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा करत मृतदेह ताब्यात घेतला. वसमत येथील उपजिल्हा रुग्णालयात शवविच्छेदन करुन मृतदेह नातेवाईकांच्या स्वाधीन करण्यात आला. याप्रकरणी वसमत ग्रामीण पोलीस ठाण्यात गोपीनाथ कुसळे यांच्या माहितीवरून आकस्मीक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. मयत शेतकरी रामा कुसळे यांचा विवाह चार वर्षापुर्वी सातेफळ येथील त्र्यंबक मुंजाजी अंभोरे यांच्या मुलीसोबत झाला होता. त्यांच्या पश्चात पत्नी, आई-वडील, दोन मुली, दोन भाऊ असा परिवार आहे.

आपली प्रतिक्रिया द्या