
DGCA म्हणजेच नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाने देशातील प्रमुख विमान कंपन्यांचे सुरक्षा ऑडिट केले आहे. हे ऑडिट वार्षिक देखरेख योजनेअंतर्गत करण्यात आले. यामध्ये गेल्या एका वर्षात लेव्हल 1 आणि लेव्हल 2 संदर्भातील तब्बल 263 त्रुटी आढळल्या आहेत. विमानांच्या सुरक्षिततेची आणि नियमांचे पालन सुनिश्चित करण्यासाठी आंतरराष्ट्रीय मानके आणि आयसीएओ (आंतरराष्ट्रीय नागरी विमान वाहतूक संघटना) च्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार हे ऑडिट करण्यात आल्याचे डीजीसीएने म्हटले आहे.
डीजीसीएने स्पष्ट केले की, ज्या विमान कंपन्यांचे जाळे मोठ्या प्रमाणात विस्तारलेले आहे. तसेच विमानांची संख्यादेखील अधिक आहे अशा विमान कंपन्यांमध्ये असे दोष आढळणे सामान्य आहे. जगभरातील मोठ्या विमान कंपन्यांमध्ये हे दिसून येते. डीजीसीएने म्हटले आहे की, “सुरक्षा वाढविण्यासाठी, नियमांचे पालन सुनिश्चित करण्यासाठी आणि ऑपरेशन्स सुधारण्यासाठी हे ऑडिट आवश्यक आहे.
सर्व विमान कंपन्यांना वेळेवर घेतलेल्या सुधारात्मक उपाययोजनांचा अहवाल देण्यास आणि या कमतरता दूर करण्यास सांगण्यात आले आहे. 1 जुलै ते 4 जुलै दरम्यान करण्यात आलेल्या आॅडिटमध्ये ऑपरेशन्स, फ्लाइट शेड्यूलिंग, रोस्टरिंग आणि इतर प्रमुख कार्ये तपासण्यात आली. DGCA च्या तपासणीनुसार, एअरलाइन क्रू मेंबर प्रशिक्षण, ड्युटी आणि विश्रांती कालावधीचे नियम, अपुरी क्रू संख्या आणि एअरस्पेस यासारख्या विविध गोष्टींमध्ये त्रुटी आढळल्या.
हे ऑडिट गुरुग्राम येथील एअर इंडियाच्या मुख्यालयात करण्यात आले होते. यात उड्डाणाचे वेळापत्रक, रोस्टरिंग आणि ऑपरेशनल प्रोटोकॉल यासारख्या प्रक्रियांची तपासणी करण्यात आली. यापूर्वी 21 जूनला नियामकाने एअर इंडियाला गंभीर त्रुटींमुळे तीन अधिकाऱ्यांना तात्काळ काढून टाकण्याचे निर्देशही दिले होते.