साडेचार महिन्यात 264 बेकायदा बांधकामे भुईसपाट; उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर ठाणे महापालिकेची कारवाई

गेल्या साडेचार महिन्यात ठाण्यात २६४ बेकायदा बांधकामे भुईसपाट करण्यात आली आहेत. त्यापैकी १९८ बांधकामे पूर्णपणे जमीनदोस्त करण्यात आली असून ६६ बांधकामांमधील वाढीव बांधकाम हटवण्यात आले आहे. उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर ठाणे पालिका प्रशासनाने कारवाईचा सपाटा लावला आहे. सुट्टीच्या दिवशीही अतिक्रमणविरोधी पथकाने तब्बल ५० भूमाफियांवर गुन्हे दाखल केले आहेत.

बेकायदा बांधकामप्रकरणी उच्च न्यायालयाने आदेश दिल्यानंतर पालिकेच्या अतिक्रमण पथकाने १९ जूनपासून कारवाईला सुरुवात केली. आयुक्त सौरभ राव यांनी नऊ प्रभाग समिती क्षेत्रांमध्ये उपायुक्त दर्जाच्या अधिकाऱ्यांच्या नेतृत्वात विशेष पथकांची नियुक्ती केली. प्रभाग समिती क्षेत्रात बीट निरीक्षकांनी नोंदवलेली आणि सध्या सुरू असलेली बेकायदा बांधकामे पाडण्यास प्राधान्य देण्यात आले. दरम्यान, बेकायदा बांधकामांविषयी तक्रार आल्यास त्याची शहानिशा करून ती बांधकामे तत्काळ तोडण्यात आली असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली.

दिवा, मुंब्यात सर्वाधिक बेकायदा इमारती
प्रभाग समितीच्या बीट निरीक्षकांनी केलेल्या पाहणीत दिवा आणि मुंब्रा येथील सर्वाधिक बेकायदा इमारतींचा समावेश आहे. शनिवारी महापालिका आयुक्त राव यांनी कारवाईचा आढावा घेतला. कोणतेही अनधिकृत बांधकाम सुरू राहू नये यासाठी सर्व यंत्रणेने दक्ष राहावे. तसेच कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून तातडीने एमआरटीपीअंतर्गत गुन्हे दाखल करण्यात यावेत असे आदेशही राव यांनी दिले आहेत.

न्यायालयाने विचारलेल्या १९ प्रश्नांचे काय झाले?
बेकायदा बांधकामांची न्यायालयाने गंभीर दखल घेत सत्र न्यायाधीशांनी १९ प्रश्नांची उत्तरे मागवली. मात्र त्यानंतरही या प्रश्नांवर प्रशासनाने उत्तरे दिली नाहीत. त्यामुळे या प्रश्नांचे काय झाले, असा सवाल विचारण्यात येत आहे.

क्यूआर कोड लावून बांधकामांची माहिती
बेकायदा बांधकामे असतील तर त्याचे प्रवेश मार्ग (जिने) पाडून पत्रे लावून बंद करावेत. ज्या इमारतींचे बांधकाम सुरू आहे त्या सर्व ठिकाणी दर्शनी भागात क्यूआर कोड लावण्यात आले आहे. या क्यूआर कोडवरून बांधकामांची माहिती सर्वांना उपलब्ध होऊ शकते, असेही आयुक्त राव यांनी स्पष्ट केले.

गुन्हे दाखल लेखाजोखा
नौपाडा-कोपरी – १
दिवा – ११
मुंब्रा- १३
कळवा – ४
उथळसर – १
माजिवडा-मानपाडा – ५
वर्तकनगर – ८
लोकमान्यनगर-सावरकरनगर- ७
एकूण – ५०