कोल्हापूरात कोरोनाबाधितांची संख्या 200 वर; दिवसभरात 30 नवे रुग्ण आढळले

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
corona-virus-new-lates

कोल्हापूर जिल्ह्यात कोरोनाबाधितांची संख्या गुरुवारी 179 झाली होती. गुरुवारी सकाळपर्यंत आणखी तीन नवीन रुग्णांची भर पडली. सायंकाळी 4.30 वाजता तब्बल 27 जणांचे अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आल्याने जिल्ह्यात कोरोनाबाधितांची संख्या 209 झाली होती. रुग्णांची वाढती संख्या आणि रात्री उशीरापर्यंत विविध लॅबमधून अहवाल येत असल्याने कोरोनाबाधितांची संख्या आणखी वाढण्याची शक्यता आहे.

बांबवडे (ता.शाहुवाडी) येथील एक दांपत्य आणि गगनबावडा तालुक्यात एक तरुण असे तीन नवे रुग्ण आढळले. तर सायंकाळी 4.30 वाजण्याच्या सुमारास आणखी नवे 27 कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले. यातील शहर आणि करवीर तालुक्यातील 8,शाहुवाडी 8,चंदगड 7 आणि राधानगरी 1 असे नवे रुग्ण आढळले आहेत. जिल्ह्यात सीपीआर, आयजीएम, डॉ.डी.वाय. पाटील,आयसोलेशन हॉस्पीटल या प्रमुख रुग्णालयांसह गडहिंग्लज, चंदगड, आजरा, कागल, राधानगरी, हातकणंगले, भूदरगड, गगनबावडा, पन्हाळा, शाहूवाडी, शिरोळ या तालुक्यांसह अतिग्रे येथील संजय घोडावत हॉस्टेल,ॲपल हॉस्पीटल आणि आधार हॉस्पीटल या एकूण 18 ठिकाणी स्वॅब कलेक्शन करण्यात येते. बुधवारी रात्री 8.30 पर्यत 1 हजार 295 आणि गुरुवारी सकाळी 10 वाजेपर्यंत 343 असे एकूण 1 हजार 638 अहवाल निगेटिव्ह आले आहेत. ही जिल्ह्यासाठी दिलासादायक बाब आहे.