जम्मूतील पुरात अडकलेल्या 27 जवानांना वाचवले; मुसळधार पाऊस आणि भूस्खलनामुळे हाहाकार

जम्मू-कश्मीरमध्ये विविध ठिकाणी मुसळधार पाऊस आणि भूस्खलनामुळे अक्षरशः हाहाकार माजला आहे. महापुरात अडकलेल्या 27 जवानांना वाचवण्यात आले. हिंदुस्थानी लष्कराच्या व्हाइट नाइट कोरच्या पथकाने तब्बल 10 तास बचाव मोहीम राबवून जम्मूच्या जोरियन येथे अडकलेल्या लष्कराच्या जवानांना वाचवले.

दुसरीकडे पंजाबमध्ये तब्बल 7 जिल्हे आणि 150 हून अधिक गावे महापुरात सापडली. रावी, बियास आणि सतलज नदीच्या पाण्याची पातळी वाढल्याने महापूर आला आहे. राज्यभरात 30 ऑगस्टपर्यंत सर्व शाळा बंद आहेत. हिमाचल प्रदेशातही मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. चंदिगड-मनाली महामार्गावर मोठय़ा प्रमाणावर भूस्खलन झाले. राज्यातील 3 जिह्यांत 2 हजारांहून अधिक पर्यटक अडकले आहेत. अनेक घरांत दगड, माती, चिखलाचा ढिगारा घुसला आहे.