संगमेश्वर तालुक्यातील ७० पेक्षा अधिक गावे २७ तास अंधारात

421

संगमेश्‍वर तालुक्याला विज पुरवठा करणार्‍या 33 केव्ही विज वाहिन्यांमध्ये झालेल्या तांत्रिक बिघाडामुळे तालुक्यातील 70 पेक्षा अधिक गावे गेले 27  तास अंधारात आहेत. ना पाऊस, ना वारा, नैसर्गिक आपत्ती नसतानाही 33 केव्हीच्या लाईन बंदच कशा पडतात असा सवाल करत तालुकावासियांनी महावितरणच्या कारभाराबाबत तिव्र नाराजी व्यक्त केली आहे. मंगळवारी सकाळी 11 वाजता गायब झालेली विज बुधवारी संध्याकाळपर्यंत सुरळीत न झाल्याने स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येलाच ग्राहकांना काळोखाचा सामना करावा लागला आहे.

संगमेश्वर तालुक्याला विज पुरवठा करणार्‍या 33 के व्ही च्या दोन लाईन आहेत. एक लाईन निवळी ते संगमेश्वर आणि दुसरी आरवली ते संगमेश्वर अशी ओढण्यात आली आहे. यातील एक लाईन नादुरुस्त झाली तर दुसरी वापरायची असते. यातील एक लाईन काल सकाळी 11 वाजता तांत्रिक बिघाडामुळे बंद पडली. यामुळे गेले 24 तास तालुक्यातील 70 पेक्षा अधिक गावे अंधारात आहेत. महावितरणने दुसरी नादुरुस्त लाईन दुरुस्त करुन ठेवली असती तर ही वेळ आली नसती असे मत ग्राहकांनी व्यक्त केले आहे.

संगमेश्वरला पत्रकार आणि  ग्रामस्थांनी पाठपुरावा करुन उपअभियंता कार्यालय मंजुर करण्यात आले, मात्र गेले वर्षभर येथे उप अभियंता कार्यरत नाही. पत्रकार ग्रामस्थांच्या पाठपुराव्याने आरवली येथे 110 केव्हीचे केंद्र सुरू करण्यात आले तरी आरवली संगमेश्वर ही कमी अंतराची लाईन देखभाल दुरुस्ती करुन सुरळीत ठेवता येत नसल्याने ग्राहक नाराज आहेत.

ग्राहकांच्या सहनशक्तीचा अंत पाहिला जात असून पूर्वी सारखी उग्र आंदोलने आता होत नसल्याने महावितरणचे फावले असल्याची टीका होत आहे. काल दुपारी 11 वाजता 33 केव्ही आरवली संगमेश्वर विज पुरवठा खंडित झाला. यावेळी पर्याय म्हणून असणारी निवळी संगमेश्वर लाईन आधी पासून नादुरुस्त असल्याने पर्यायी विज पुरवठा उपलब्ध होवू शकला नाही. बिघाड दुपारी झाला मात्र महावितरणचे कर्मचारी दुपारनंतर आरवली संगमेश्वर लाईनवर बिघाड शोधत होते. एक बिघाड सापडल्यानंतर नवीन बिघाड निर्माण होत होता. यामुळे या लाईनची देखील देखभाल दुरुस्ती वेळेवर केली जात नाही हे स्पष्ट झाले. रात्री 11 वाजेपर्यंत कर्मचार्‍यांना बिघाड न सापडल्याने दुरुस्तीचे काम सोडून देण्यात आले. काल पासून वादळ वारा पाऊस असे काही नसतांना 24 तास विज पुरवठा खंडित राहात असेल तर दाद मागायची कोणाकडे असा सवाल ग्राहकांना पडला आहे.  विज प्रवाह खंडित राहिल्याने आज नळ पाणी योजना बंद राहिल्या व पावसाळ्यात कृत्रिम पाणी टंचाईला तोंड द्यावे लागले. संगमेश्वर महावितरण कार्यालयातील उप अभियंता हे गेले वर्ष भर रिक्त असणारे पद तातडीने भरावे तसेच लाईन स्टाफची देखील कमतरता गणेशोत्सवापूर्वी भरुन काढावी अन्यथा महावितरणच्या संगमेश्वर कार्यालयावर धडक द्यावी लागेल असा इशारा संगमेश्वरचे उपसरपंच संजय कदम यांनी दिला आहे.

आपली प्रतिक्रिया द्या