प्रवासासाठी 1 लाखांवर पुणेकरांकडून पाससाठी अर्ज; 27 हजार 592 अर्जदारांना ई-पास

लॉकडाउनमध्ये अत्यावश्यक कामांसाठी 1 लाख 5 हजार 744 पुणेकरांनी पोलिसांकडे ई-पाससाठी अर्ज केला आहे. त्यापैकी 27 हजार 592 अर्जदारांना ई-पास मंजूर करण्यात आले असून 57 हजार अर्ज नाकारण्यात आले आहेत. वैद्यकीय उपचारासह नातेवाईकांच्या अंत्यविधीसाठी प्रवास करणाऱ्या नागरिकांना तातडीने पास देण्यात आला आहे. कागदपत्रांची अपुर्तता आणि प्रवासाला ठोस अत्यावश्यक कारण नसल्यामुळे ई-पाससाठी करण्यात आलेले अर्ज नाकारण्यात आले आहेत.

अत्यावश्यक कामांसाठी प्रवास करताना नागरिकांना पोलिसांकडून ऑनलाइन माध्यमातून डिजिटल ई-पास देण्याची सुविधा सुरू करण्यात आली. कोरोनाचा संसर्ग वाढत असल्यामुळे शासनाने 15 मेपर्यंत निर्बंध कायम ठेवले आहेत. त्यामुळे अत्यावश्यक कारणासाठी नागरिकांना राज्यार्तंगत तसेच जिल्हाअंतर्गत प्रवास करण्यासाठी ई-पास घेणे बंधनकारक असून कागदपत्रांची छाननी केल्यानंतरच नागरिकांना आंतरजिल्हा प्रवासाला ई-पास मंजूर करण्यात येत आहेत.

नागरिकांना जवळच्या व्यक्तीचा अंत्यविधीसाठी (आई, वडील, भाऊ, बहिण, चुलत भाऊ-बहिण, दीर, मेहुणे) पास दिला जात आहे. त्याशिवाय गंभीर आजारी असलेल्यांनाही प्रवासासाठी परवानगी देण्यात आली आहे. त्यासाठी नागरिकांनी नातेसंबंध व आजारपणाचा पुरावा अर्जासोबत वेबसाईटवर अपलोड करावा लागत आहे. अत्यावश्यक कामांसाठी घराबाहेर पडायचे असल्यास नागरिकांनी कोवीड 19 डॉट एमएचपोलीस डॉट इन वेबसाईटवर नोंदणी करून ई-पास मिळवावा. अन्यथा विनापास प्रवास करणाऱ्यांविरूद्ध कडक कारवाई करण्याचा इशारा पोलिसांनी दिला आहे.

आंतरजिल्हा प्रवासासाठी पोलिसांचा ई-पास आवश्यक आहे. त्यानुसार आतापर्यंत 27 हजारांवर अर्जदारांना प्रवासासाठी ई-पास देण्यात आला आहे. त्याशिवाय कागदपत्रांची अपुर्तता आणि विविध कारणांमुळे 57 हजारांवर अर्ज नाकारण्यात आले आहेत. प्रवासासाठी ई-पासची मुदत 15 मेपर्यंत वाढविण्यात आली आहे. नागरिकांनी अत्यावश्यक काम असल्यास घराबाहेर पडावे. विनाकारण भटकंती, विनामास्क प्रवास, कोरोना नियमावलीचे उल्लंघन करणाऱ्यांविरुद्ध कारवाईचा बडगा उगारला जाणार आहे.
– श्रीनिवास घाडगे, पोलीस उपायुक्त, गुन्हे शाखा, पुणे शहर

आपली प्रतिक्रिया द्या