विनयभंग: ‘तिच्या’ आत्महत्येनंतर आरोपीसह आई-वडिलांना अटक

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
avinash-rathod

विजय जोशी । नांदेड

माहूर तालुक्यातील नाईकवाडी येथे अल्पवयीन मुलीचा विनयभंग करून आरोपीच्या नातेवाईकांनी पीडित मुलींवरच खोटे आरोप करून मुलीस आत्महत्या करण्यास प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. सिंदखेड पोलिसांनी या प्रकरणी तीन आरोपींना अटक केली आहे.

माहूर तालुक्यातील नाईकवाडी येथे १७ ऑगस्ट रोजी आरोपी अविनाश रमेश राठोड याने गावातील १६ वर्षीय अल्पवयीन मुलगी घरात एकटी असल्याचा फायदा घेत तिचा विनयभंग केला. त्यावेळी विनयभंग करताच पीडित मुलीने आरडाओरड केल्यामुळे आरोपीने तिथून पळ काढला. घडलेला सर्व प्रकार मुलीने आई वडिलांना सांगितला. मुलीच्या आई वडिलांनी आरोपी अविनाश राठोडच्या घरी जाऊन घडलेला प्रकार त्याच्या आई वडिलांना सांगितला. त्यावेळी आरोपीच्या आई वडिलांनी मुलास समजावून सांगण्याऐवजी मुलीचीच बदनामी केली. ही बदनामी मुलीला सहन झाली नसल्याने पीडित मुलीने १८ ऑगस्टच्या रात्री ११ वाजेच्या दरम्यान विष पिऊन गावातील विहिरीत उडी घेतली असता त्यात निष्पाप पीडित मुलीचा मृत्यू झाला. या प्रकरणी मुलीचे नातेवाईक केशव रामजी पवार यांनी सिंदखेड पोलीस ठाण्यात तक्रार दिली.

तक्रारीनुसार सिंदखेड पोलिसांनी आरोपी रमेश राठोड आणि त्याचे आई वडील छबुबाई रमेश राठोड व रमेश थावरा राठोड यांच्यावर गुन्हे दाखल करून तिन्ही आरोपींना अटक केली आहे. या प्रकरणाचा तपास साहाय्यक पोलीस निरीक्षक मल्हार शिवरकर करत आहेत.