
बीड जिल्ह्यामध्ये बुधवारी 54 व्यक्तींचे स्वॅब तपासणीसाठी पाठवण्यात आले. त्यात तिघांचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आल्याचे निष्पन्न झाले आहे. हे तिघेही बीड शहरातील आहेत. अजिजपुरा आणि कारंजा रोड परिसरामध्ये नव्याने रूग्ण सापडत असल्याने चिंता व्यक्त केली जात आहे. सकाळपर्यंत उपचार घेणाऱ्या कोरोनाबाधितांची संख्या 7 होती. त्यात आता 3 जणांची भर पडल्याची ती संख्या 10 झाली आहे.
बीड जिल्ह्यातून बुधवारी 54 जणांचे सॅम्पल तपासणीसाठी स्वाराती ग्रामिण वैद्यकीय महाविद्यालय अंबाजोगाईमध्ये पाठवण्यात आले होते. त्यात बीडच्या जिल्हा रूग्णालयातून 14, कोविड सेंटरमधून 9, ग्रामिण रूग्णालय आष्टीतून 12, केज उपजिल्हा रूग्णालयातून 2, परळी उपजिल्हा रूग्णालयातून 2, कोविड सेंटर अंबाजोगाईमधून 10 तर स्वामी रामानंद तिर्थ ग्रामिण वैद्यकीय महाविद्यालयातून 5 असे 54 जणांचे सॅम्पल तपासणीसाठी पाठविण्यात आले. त्याचा अहवाल मिळाला आहे. त्यात 48 जणांचा अहवाल कोरोना निगेटिव्ह आला आहे. तर तिघे जण कोरोना पॉझिटिव्ह आले. तर निष्कर्ष न निघलेला एक रूग्ण आहे. रिजेक्ट केलेला अहवाल दोन जणांचे आहेत. जे तीन पॉझिटिव्ह आढळले आहेत, त्यात अजिजपुरा भागातील 29 वर्षीय महिला, जुना बाजार भागातील 48 वर्षीय पुरूष, कारंजा रोड भागातील 66 वर्षीय महिला यांचा समावेश आहे.
शिरूरच्या रूग्णावर नगरमध्ये उपचार सुरू
शिरूर तालुक्यातील तरडगव्हाण येथील एका 37 वर्षीय इसमाची तपासणी केली असता त्याचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. त्याला नगर येथील शासकीय रूग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. शिरूर तालुक्यातील तरडगव्हाण येंथील एक व्यक्ती ठाण्यामध्ये नोकरीला होता. 29 तारखेला तो नगर येथे आल्यावर त्याच्या स्वॅबचे नमुने तपासणीसाठी घेतले असता या व्यक्तीचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. ठाणे ते नगर प्रवासामध्ये त्याला कोरोनाची लागण झाल्याचा संशय आहे. त्याच्यासोबत असणाऱ्या तीन जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले आहेत. ही व्यक्ती मूळची शिरूर तालुक्यातील असली तरी या व्यक्तीचा शिरूर तालुक्यातील कोणाशीही संपर्क आला नसल्याने शिरूरकरांची चिंता मिटली आहे.




























































