
सामना ऑनलाईन । मुंबई
प्रवासादरम्यान अनोळखी प्रवाशांकडून कोणतेही खाद्यपदार्थ घेऊ नका असं वारंवार सांगितलं जातं. त्यामुळे प्रवासात बऱ्याचदा लोक सावध असतात. पण तरीही काहीवेळा या सूचनेकडे दुर्लक्ष केलं जातं आणि त्यामुळे अनर्थ घडू शकतो. असंच काहीसं एका रेल्वे प्रवाशाबाबतीत घडलं आहे.
टाइम्स ऑफ इंडियाने दिलेल्या वृत्तानुसार, रोहित शर्मा हा तरुण 13 ऑक्टोबर रोजी कुर्ला टर्मिनसवरून सुटणाऱ्या पवन एक्सप्रेसमध्ये चढला होता. त्यावेळी त्याच्या सीटशेजारी तीन जण बसले होते. त्यांनी रोहितची विचारपूस करत आपल्यासोबत चहा पिण्यास सांगितलं. चहा पित गप्पा मारत असताना त्या तिघांनी त्याला बिस्कीटं देऊ केली. गप्पांच्या नादात रोहितने ती बिस्कीटं खाल्ली. बिस्कीटं खाल्ल्यानंतर त्याला गुंगी येऊन तो बेशुद्ध पडला. त्यानंतर सुमारे दहा तासांनी त्याला जाग आल्यानंतर त्याच्याकडील २५ हजार रुपये, कपड्यांची बॅग आणि मोबाईल चोरीला गेल्याचं लक्षात आलं.
रोहितने त्वरित रेल्वे पोलीस ठाणं गाठत या घटनेची तक्रार केली. रेल्वे पोलिसांनी कुर्ला टर्मिनसवरील सीसीटीव्ही फुटेजचा आधार घेत राजेश पाल (38), पपी भारतीया (34) आणि राजकुमार केसरवानी (36) या तिघांनाही अटक केली. हे तिघेही सराईत गुन्हेगार असून लांब पल्ल्यांच्या गाड्यांमधील प्रवाशांना झोपेच्या गोळ्या मिसळलेला चहा, बिस्कीटं, शीतपेयं देऊन ते लुटमार करतात, अशी माहिती रेल्वे पोलिसांनी दिली आहे. या प्रकरणी तिघांवरही गुन्हा दाखल झाला असून पुढील तपास सुरू आहे.
summary- 3 rob train passenger by offering him biscuits

























































