जालन्यात 30 किलो चांदी जप्त; चार आरोपी पोलिसांच्या ताब्यात

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

जालन्यातील नागेवाडी टोल नाक्याजवळ दहशतवादविरोधी पथक आणि चंदनझिरा पोलिसांनी सापळा लावत शनिवारी सकाळी 30 किलो चांदी जप्त केली आहे. याप्रकरणी चार आरोपींना ताब्यात घेण्यात आले असून एक कारही जप्त करण्यात आली आहे. संभाजीनगर-जालना रोडवर गस्त घालत असताना दहशतवादी विरोधी पथकातील पोलिसांना माहिती मिळाली की, संभाजीनगरहून जालनाकडे एक संशयित चारचाकी वाहन येत आहे. त्यात संशयीत सामग्री असल्याची माहिती पथकला मिळाली होती. पथकाने स्थानिक पोलिसांच्या मदतीने नागेवाडी टोलनाका येथे सापळा लावला. मिळालेल्या माहितीनुसार संशयित गाडी दिसताच ती थांबवून तिची पाहणी करण्यात आली. गाडीच्या पाठीमागच्या बाजूस दोन पिशव्या सापडल्या. त्यात चांदीचे वेगवेगळ्या वजनाचे 25 तुकडे होते. त्यांचे वजन अंदाजे 30 किलो आहे.

यासंदर्भात गाडीतील प्रविण नंदलाल भोमा (रा. कुंभारवाडा, औरंगपुरा, संभाजीनगर), अस्लमखान मसुदखान (वाहनचालक रा. बेगमपुरा, संभाजीनगर), मनोज ओमप्रकाश वर्मा (रा. देवानगर,संभाजीनगर), सय्यद फारुख सय्यद हमीद्दोदीन ( रा. रहिमानीया कॉलनी,संभाजीनगर) यांच्याकडे विचारपूस करण्यात आली. ही चांदी संभाजीनगर येथून नांदेडला घेऊन जात असल्याचे त्यांनी सांगितले. त्या चोघांना ताब्यात घेतले असून त्यांच्याकडून 30 किलो चांदी व गुन्ह्यासाठी वापरलेली पांढऱ्या रंगाची गाडी असा एकूण 26 लाख 80 हजार 336 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. याप्रकरणी आरोपीविरोधात चंदनझिरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक प्रमोद बोंडले करीत आहेत. ही कामगिरी पोलीस अधिक्षक एस.चैतन्य, अपर पोलीस अधिक्षक समाधान पवार, उपविभागीय पोलीस अधिकारी सुधीर खिरडकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक गंदम, पोलीस उपनिरीक्षक प्रमोद बोंडले, दहशतवाद विरोधी पथकातील अंकुश राठोड, शेख रशीद, दिनेश बरडे, संजय गवळी, राजु घुगे, अभिजित अडीयाल, तौसिक पठाण, अनिल काळे यांनी केली आहे.