
एका दिवसात 30 किलोमीटरचा पक्का डांबरी रस्ता तयार करण्याचा विश्वविक्रम सातारा जिल्ह्यात नोंदवला गेला आहे. दुष्काळी खटाव तालुक्यातील पुसेगाव ते म्हासुर्णे या रस्त्याला या विश्वविक्रमाचा मान मिळाला आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या माध्यमातून ‘राजपथ इन्फ्राकॉन’ने ही ऐतिहासिक कामगिरी केली आहे. ‘लिम्का बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड’मध्ये या विक्रमाची नोंद झाली आहे. यापूर्वी विजापूर-सोलापूर या 25.54 किलोमीटर रस्त्याच्या नावावर हा विक्रम होता. मात्र, तेवढय़ा अंतराचा रस्ता अवघ्या 14 तासांत पूर्ण करून तो विक्रमही ‘राजपथ इन्फ्राकॉन’ने मोडित काढला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सर्व अधिकारी, कर्मचारी, उद्योजक यांचे दूरध्वनीवरून काwतुक केले.
विश्वविक्रमाला गवसणी घालण्याच्या इराद्यानेच ‘राजपथ इन्फ्राकॉन’ने हे काम हाती घेतले होते. या कामासाठी 60 अभियंते, 47 पर्यवेक्षक, 23 गुणवत्ता नियंत्रक अभियंते, 150 वाहनचालक, 110 मजूर असे प्रचंड मनुष्यबळ रस्त्यावर उतरले होते. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या 15 अभियंत्यांनी काम पाहिले. एकाचवेळी तीन शिफ्टमध्ये हे काम करण्यात आले. सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता संजय मुनगीलवार, कार्यकारी अभियंता शंकर दराडे यांनी नियोजन करून हे काम तडीस नेण्यासाठी मागील दोन महिन्यांपासून तयारी केली होती.
यावेळी ‘राजपथ इन्फ्राकॉन’चे अध्यक्ष व कार्यकारी संचालक जगदीश कदम, संचालिका मोहना कदम, अर्थ संचालक डॉ. राजेंद्र हिरेमठ, प्रकल्प संचालक शिवनाथ ढाकणे आदी उपस्थित होते.

































































