ठाण्याच्या प्रभाग 15 मध्ये 3 हजार 104 दुबार मतदार; नावे का वगळली नाहीत? शिवसेना महाविकास आघाडीचा नोंदणी अधिकाऱ्यांना सवाल

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका कोणत्याही क्षणी जाहीर होण्याची शक्यता असतानाच ठाण्याच्या प्रभाग क्रमांक १५ मध्ये ३ हजार १०४ दुबार नावे असल्याची धक्कादायक बाब निदर्शनास आली आहे. ही नावे का वगळली नाहीत, असा सवाल शिवसेना महाविकास आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना केला आहे. लवकरात लवकर ही नावे वगळली नाही तर आंदोलन छेडण्याचा इशारादेखील देण्यात आला आहे.

प्रभाग क्रमांक १५ येथे ३ हजारांहून अधिक दुबार मतदार असल्याचे दिसून येताच शिवसेना महाविकास आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी मतदार नोंदणी अधिकारी सर्जेराव म्हस्के-पाटील यांच्या वतीने सहाय्यक मतदार नोंदणी अधिकारी किशोर पाटील यांची भेट घेतली. तसेच त्यांना निवेदनदेखील दिले. यावेळी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे वागळे इस्टेट विभागप्रमुख प्रतीक राणे, विधानसभा उपसंघटक कांता पाटील, अंजनीकुमार सिंह, हिंदुराव गळवे, मनसेचे सचिव पवन पडवळ, अनिल माने, उपविभागप्रमुख श्रीधर सकपाळ, ओमकार जयपाल आदी उपस्थित होते.

दुरुस्तीनंतरच प्रारूप यादी जाहीर करा

दुबार मतदारांची माहिती तसेच नोंदणी संख्या आम्ही अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणून दिली. तरीदेखील ठोस पावले प्रशासनाने उचलली नाहीत. सर्वत्र अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर होत असतानादेखील दुबार मतदार नोंदणी जाणीवपूर्वक केली जात असून ती रोखली जात नाहीत. ही अत्यंत शरमेची बाब असल्याचे शिवसेना विभागप्रमुख प्रतीक राणे यांनी सांगितले. दरम्यान, दुबार मतदारांचे सर्वेक्षण करून यादी दुरुस्त करावी व त्यानंतरच प्रारूप यादी जाहीर करावी, अन्यथा आंदोलन छेडण्यात येईल असा इशाराही दिला आहे.