शेतकरी आंदोलकांना लाल किल्लाच ताब्यात घ्यायचा होता, दिल्ली पोलिसांचा खळबळजनक खुलासा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

प्रजासत्ताक दिनी कृषी कायद्यांविरोधात दिल्लीत लाल किल्ल्यावर झालेल्या हिंसाचाराबाबत दिल्ली पोलिसांनी खळबळजनक खुलासा केला आहे. आंदोलनकर्त्यांना लाल किल्ल्यावर केवळ साहिब निशाण किंवा शेतकरी संघटनांचा झेंडा फडकवायचा नव्हता तर त्यांचा लाल किल्ल्यालाच आंदोलनाची भूमी बनवण्याचा डाव होता, तेथूनच आंदोलन सुरू ठेवण्याची त्यांची योजना होती, असे पोलिसांनी दाखल केलेल्या चार्जशीटमध्ये म्हटले आहे.

कृषी कायद्यांविरोधात दिल्लीच्या वेशीवर आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांनी 26 जानेवारी रोजी दिल्लीत ट्रक्टर रॅली काढली होती. यावेळी शेकडो आंदोलनकर्त्यांनी हिंसाचार करत लाल किल्ल्यावर घुसून साहिब निशाण आणि शेतकरी संघटनांचे झेंडे फडकवले होते. याबाबत पोलिसांनी 3232 पानांची चार्जशीट दाखल केली आहे. तसेच दिल्लीतील ट्रक्टर रॅलीसाठी पंजाब आणि हरयाणातील शेतकऱ्यांनी मागील वर्षीच्या तुलनेत डिसेंबर 2020 मध्ये 95 टक्के अधिक ट्रक्टर खरेदी केले होते, जानेवारीच्या सुरुवातीला 85 टक्के अधिक ट्रक्टर खरेदी झाली होती, हे आकडेवारीवरून स्पष्ट झाले आहे. त्यामुळे दिल्लीतील ट्रक्टर रॅली पूर्वनियोजित होती, असेही पोलिसांनी म्हटले आहे. तसेच जागतिक स्तरावर आपले आंदोलन पोहचावे, केंद्र सरकारवर नामुष्की यावी म्हणूनच आंदोलनकर्त्यांनी प्रजासत्ताक दिनाची निवड केली होते, हे चौकशीतून निष्पन्न झाल्याचेही पोलिसांनी नमूद केले आहे.

लाल किल्ल्यावर साहिब निशाण फडकवण्यासाठी पैशाचे आमिष

दिल्लीतील ट्रक्टर रॅली दरम्यान हिंसाचार भडकवण्यासाठी आणि लाल किल्ल्यावर साहिब निशाण फडकवण्यासाठी शीख फॉर जस्टीस ग्रुपने आपल्याला पैशाचे आमिष दाखवले होते, असे आरोपी इकबाल सिंह याने सांगितल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले आहे. तसेच इकबाल सिंहची मुलगी आपल्याला लवकरच 50 लाख रुपये मिळणार असल्याचे सांगत असल्याची ऑडिओ क्लिप असल्याचेही पोलिसांनी म्हटले आहे. इकबाल जानेवारीच्या सुरुवातीला पंजाबच्या तरनतारणला एका बैठीकसाठी गेला होता. त्यामुळेच हिंसाचारामध्ये तेथील अनेक तरुण आघाडीवर होते, असेही पोलिसांनी चार्जशीटमध्ये नमूद केले आहे.