प्रधानमंत्री मुद्रा योजनेच्या नावाखाली 33 लाखांची फसवणूक सायबर सेलकडून आरोपीला अटक

प्रधानमंत्री मुद्रा योजनेच्या कर्जाच्या नावाखाली व्यावसायिकाची 33 लाख रुपयांची फसवणूकप्रकरणी तरुणाला उत्तर प्रादेशिक सायबर सेल पोलिसांनी अटक केली. विकास नवल किशोर असे त्याचे नाव आहे. त्याला न्यायालयाने पोलीस कोठडी सुनावली आहे.

तक्रारदार याचा इमिटेशन ज्वेलरीचा व्यवसाय आहे. त्याना व्यवसाय वायासाठी दहा लाखांच्या कर्जाची गरज होती. त्यासाठी त्याने एक लोन ऍप्स डाऊनलोड केले होते. त्यावर त्याने कर्जासाठी अर्ज केला होता. ठगाने तो प्रधानमंत्री मुद्रा योजनेच्या बीकेसी येथील कार्यालयातून बोलत असल्याचे भासवले. कमी व्याजदरात दहा लाखांचे कर्ज मिळवून देतो असे त्यांना भासवले. त्यावर विश्वास ठेवून कागदपत्रे आणि फोटो पाठवले. काही दिवसांनी त्याना एक पत्र व्हॉट्सअपवर आले. त्या पत्रावर विश्वास ठेवून त्याने प्रोसेस फी म्हणून सुरुवातीला दीड हजार रुपये पाठवले. त्यानंतर विविध कारणे सांगून ठगाने त्याच्याकडून पैसे उकळणे सुरू केले.

पैसे पाठवल्यानंतर दोन्ही व्यक्तींचे नंबर बंद आले. स्कॅनरवर असलेल्या नंबरमधील एक नंबर सुरू होता. त्या नंबरवर तक्रारदार याने संपर्क केला. त्याने तो एका खासगी फायनान्स कंपनीचा कर्मचारी असल्याचे सांगितले. तसेच त्यानेदेखील कर्ज मिळवून देतो असे सांगून 18 लाख 73 हजार रुपये घेतले. पैसे घेऊनदेखील त्यांना कर्ज उपलब्ध करून दिले नाही.

 प्रभारी पोलीस निरीक्षक किरण आहेर यांच्या पथकातील सहाय्यक निरीक्षक संजय पवार, सावंत, पाटील, वसईकर, नाडगौडा आदी पथकाने तपास सुरू केला. पोलिसांचे पथक दिल्लीला गेले. तेथून पोलिसांनी विकासला ताब्यात घेतले. विकास हा काही सायबर ठगांच्या संपर्कात होता. बँक खात्याची तो ठगांना पुरवत होता. त्याच्या मोबदल्यात त्याला कमिशन मिळत होते. त्याला न्यायालयाने पोलीस कोठडी सुनावली आहे.