बाप्पासाठी 3300 पेन्सिलची सुबक आरास; महाडच्या मोकल कुटुंबाचा अनोखा प्रयोग

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

चौसष्ट कला व विद्येत निपुण असलेल्या गणरायाला विद्येची देवता म्हटले जाते. महाड शहरातील गिरीश मोकल यांनी विद्येची देवता असल्याने गणरायासाठी 3300 पेन्सिलचा वापर करून सुंदर व सुबक अशी आरास केली आहे. गिरीश मोकल यांनी केलेली ही आरास पाहण्यासाठी गणेशभक्तांची रीघ लागली आहे. गणेश विसर्जन झाल्यानंतर या पेन्सिल गरीब मुलांना वाटण्यात येणार असून त्यातून सामाजिक बांधिलकी जपण्याचा आदर्श मोकल कुटुंबाने समाजापुढे ठेवला आहे.

आपल्या लाडक्या बाप्पासाठी दरवर्षी गणेशभक्त वेगवेगळ्या प्रकारच्या आरास करतात. पर्यावरणपूरक आरास करण्याकडे हल्ली गणेशभक्तांचा कल आहे. अशीच एक अनोखी आरास रायगड जिल्ह्यातील महाडमधील गिरीश मोकल यांच्या कुटुंबांनी केली आहे. त्यांनी 3300 पेन्सिलचा वापर करत ही आरास तयार केली आहे. गणपती स्थापन करण्याच्या टेबलला पेन्सिलने सजविले असून भिंतीवरही पेन्सिलने कलाकुसर केली आहे. पर्यावरणपूरक अशा मखरात गणराया स्थानापन्न झाले आहेत.

बाप्पाचे विसर्जन झाल्यानंतर बनवलेली आरास एकतर पुढल्या वर्षीसाठी जपून ठेवण्यात येते किंवा फेकून दिली जाते. मोकल यांनी या आराशीतून समाजाला एक आदर्श देण्याचा प्रयत्न केला आहे. गणेश विसर्जनानंतर मखरासाठी वापरलेल्या या सर्व पेन्सिल गरीब-गरजू विद्यार्थ्यांना वाटण्यात येणार असून त्यातून सामाजिक बांधिलकी जपण्यात येणार आहे. अशा प्रकारच्या पर्यावरणपूरक आरास नागरिकांनी कराव्यात असे आवाहन गिरीश मोकल यांनी केले आहे.