नवी मुंबई पालिकेच्या कर्मचाऱ्यांना 34 हजार 500 बोनस, ठाणे महापालिकेने दिले 24 हजार 500 सानुग्रह अनुदान

नवी मुंबई महापालिका प्रशासनाने कर्मचाऱ्यांना दिवाळीचे सानुग्रह अनुदान देण्यासाठी यंदाही बाजी मारली आहे. यंदाच्या दिवाळीसाठी पालिकेने कर्मचाऱ्यांना तब्बल ३४ हजार ५०० रुपये सानुग्रह अनुदान जाहीर केले आहे. ठाणे महापालिका प्रशासनाने यंदा दिवाळीसाठी कर्मचाऱ्यांसाठी २४ हजार ५०० रुपये बोनस जाहीर केला असून ही रक्कम गेल्या वर्षीच्या तुलनेते ५०० रुपयांनी जास्त आहे.

नवी मुंबई महापालिका प्रशासनाने गेल्या वर्षी कर्मचाऱ्यांना आणि अधिकाऱ्यांना दिवाळीच्या सणासाठी ३३ हजार रुपये बोनस दिला होता. यंदा या रकमेमध्ये महापालिका आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांनी दीड हजार रुपयांची वाढ केली आहे. त्यामुळे नवी मुंबई महापालिकेत कायमस्वरूपी असलेल्या कर्मचाऱ्यांना ३४ हजार ५०० रुपये सानुग्रह अनुदान मिळणार आहे. ठोक मानधनावर काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना २८ हजार ५०० तर आरोग्य विभागात काम करणाऱ्या आशा सेविकांना १८ हजार ५०० रुपये सानुग्रह अनुदान जाहीर करण्यात आले आहे. या भरीव सानुग्रह अनुदानामुळे पालिका कर्मचाऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण पसरले आहे.

ठाणे पालिकेने ५०० रुपये वाढवले

ठाणे महापालिका प्रशासनाने गेल्या वर्षी कर्मचारी आणि अधिकाऱ्यांना दिवाळीच्या सणासाठी २४ हजार रुपये सानुग्रह अनुदान दिले होते. यंदा या अनुदानामध्ये ५०० रुपयांची वाढ करण्यात आली आहे. त्यामुळे यंदा कर्मचारी आणि अधिकाऱ्यांना २४ हजार ५०० रुपये सानुग्रह अनुदान मिळणार आहे. या अनुदानामुळे महापालिकेच्या तिजोरीवर सुमारे २३ कोटी रुपयांचा अतिरिक्त बोजा पडणार आहे.