पालिकेत 341 अभियंत्यांची मेगाभरती, खासगी संस्थेकडून ऑनलाइन प्रक्रिया राबवणार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
bmc-2

पालिकेत लवकरच 341 कनिष्ठ अभियंत्यांची मेगा भरती होणार आहे. ही संपूर्ण भरती प्रक्रिया खासगी कंपनीच्या माध्यमातून ऑनलाइन पद्धतीने होणार आहे. ही पदे भरण्याच्या प्रक्रियेसाठी पालिका दोन कोटी रुपये खर्च करणार आहे. या भरतीमुळे रिक्त पदे भरली गेल्याने पालिकेच्या कामाला आणखी गती येणार आहे.

या भरतीमध्ये पालिका नगर अभियंता खात्याच्या अभियांत्रिकी संकर्गातील कनिष्ठ अभियंता (स्थापत्य) – 243 पदे आणि कनिष्ठ अभियंता (यांत्रिकी/विद्युत) – 98 अशी एकूण 341 पदे भरली जातील. या भरतीसाठी खासगी कंपनी ‘आयबीपीएस’कडून ऑनलाइन परीक्षा घेतली जाणार आहे. ही भरती प्रक्रिया राबवणारी ‘आयबीपीएस’ संस्था इच्छुक उमेदकारांचे अर्ज स्वीकारणे, अर्जांची छाननी करणे, उमेदवारांची ऑनलाइन परीक्षा घेणे, आरक्षणनिहाय गुणवत्ता यादी तयार करणे अशी कामे करणार आहे. पालिकेच्या निकषांनुसार पात्र ठरलेल्या उमेदवारांची प्रवर्गनिहाय गुणवत्ता यादी सादर करून त्यानंतरच त्या उमेदवारांची पात्रता ठरविण्यात येणार आहे. या भरती प्रक्रियेचा प्रस्ताव आगामी स्थायी समितीत मंजुरीसाठी मांडण्यात येणार आहे.

पालिकेच्या तिजोरीत अडीच कोटी जमा होणार

भरती प्रक्रिया राबवणाऱया संस्थेला प्रतिविद्यार्थी 350 रुपये व इतर खर्च देण्यात येणार आहे, तर पालिका एका अर्जासाठी मागासवर्गीय उमेदवारांकडून प्रत्येकी 400 रुपये तर खुल्या वर्गातील विद्यार्थ्यांकडून प्रत्येकी 600 रुपये परीक्षा शुल्क घेणार आहे. त्यामुळे पालिकेच्या तिजोरीत अडीच कोटी रुपयांपर्यंत रक्कम जमा होणार आहे. त्यातूनच परीक्षा घेणाऱया संस्थेला दोन कोटींपर्यंतचा खर्च देण्यात येणार आहे.