मोदींच्या विदेश दौर्‍यांचा खर्च ३५५ कोटी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । बंगळुरू

पंतप्रधान पदाची सूत्रे घेतल्यापासून नरेंद्र मोदी यांनी ४ वर्षांत ४१ वेळा विदेश दौरे केले. ५२ देशांना भेटी दिल्या. या त्यांच्या विदेश वारीचा खर्च ३५५ कोटी रुपये आतापर्यंत झाला आहे. ४८ महिन्यांत पंतप्रधान मोदी १६५ दिवस देशाबाहेर होते.

बंगळुरूतील आरटीआय कार्यकर्ते भिमाप्पा गदाद यांनी माहिती अधिकार कायद्या अंतर्गत पंतप्रधान कार्यालयाला (पीएमओ) नरेंद्र मोदींच्या विदेश यात्रांचा आणि त्यावर होणार्‍या खर्चाचा तपशील विचारला होता. त्यात ही माहिती ‘पीएमओ’ने दिली आहे. मात्र मोदी यांच्या देशांतर्गत दौऱयांचा तपशील आणि खर्चाची माहिती सुरक्षेच्या कारणास्तव देण्यास पीएमओने नकार दिला आहे.

मनमोहन सिंगांचे १० वर्षांत ६७ विदेश दौरे; ६४२ कोटी खर्च
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांनी २००४ ते २०१४ या दहा वर्षांत ६७ विदेश दौरे केले. त्याचा खर्च ६४२ कोटी झाला. पंतप्रधान मोदींच्या चार वर्षांतील ४१ विदेश दौऱयांचा खर्च ३५५ कोटी आहे.

अशी केली विदेशवारी
– पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी १५ जून २०१४ला पहिला विदेश दौरा भुतानचा केला.
– ४८ महिन्यांत म्हणजे ४ वर्षांत ४१ विदेश दौरे केले. त्यात ५२ देशांना भेटी दिल्या.
– ४१ विदेश दौर्‍यांचा खर्च ३५५ कोटी झाला आहे.
– पंतप्रधान मोदींचा सर्वात महाग दौरा फ्रान्सचा ठरला आहे. या दौऱयात मोदींनी फ्रान्स, जर्मनी आणि कॅनडाला भेट दिली. त्याचा खर्च ३१ कोटी २५ रुपये आला.
– भुतान दौर्‍याचा खर्च सर्वात कमी २ कोटी ४५ लाख रुपये झाला.