
कोरोनामुळे लॉकडाऊन असल्याने सर्वजण घरात अडकून पडले असले तरी पालिकेच्या माध्यमातून एका फोन कॉलवर काही मिनिटांतच तक्रारी-समस्या सोडवल्या जात आहेत. 4 मार्चपासून आतापर्यंत तब्बल 38 हजारांवर कॉल कंट्रोल रूममधील ’1916’ या क्रमांकावर आले आहेत. याठिकाणी 24 तास उपलब्ध असलेल्या कर्मचाऱयांच्या माध्यमातून संबंधित कॉलनुसार वॉर्डस्तरावर माहिती देऊन, नोडल ऑफिसरच्या समन्वयातून कार्यवाही केली जात आहे.
गेल्या काही दिवसांत मुंबईत कोरोनाचा प्रसार वाढू लागल्याने पालिकेच्या आपत्कालीन विभागात ’वॉर रूम’ सुरू करण्यात आला आहे. या ठिकाणी वरीष्ठ पातळीवर कोरोना संदर्भात कार्यवाही, राज्य सरकारशी संपर्क साधून काम केले जात आहे. याशिवाय आपत्कालीन विभागात असणारा ‘1916’ हा क्रमांकही कोरोनासंदर्भात समस्यांना उत्तरे देणे, तक्रारींची दखल घेणे यासाठी उपलब्ध करून देण्यात आला आहे. या ठिकाणी असणाऱया डॉक्टरकडून मुंबईकरांना कोरोनाबाबतच्या प्रश्न, शंका आणि लक्षणांबाबत मार्गदर्शनही करण्यात येत आहे. याठिकाणी काम करणाऱया कर्मचाऱयांना 24 तास डयुटी केल्यानंतरच सुट्टी दिली जात आहे. कर्मचाऱयांचा प्रवास कमी व्हावा, बाहेरचा संपर्क कमी व्हावा यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. हे काम करताना सोशल डिस्टन्सचे नियमही पाळले जात आहेत. शिवाय स्वच्छतेबाबतही काळजी घेतली जात आहे.
अशी होतेय कार्यवाही
पालिकेच्या कंट्रोल रूममध्ये 24 तास ‘1916’ या टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधता येऊ शकतो. यामध्ये लॉकडाऊनमुळे घराबाहेर पडता न येणारे लोक किराणा कसा आणि कुठे मिळेल?, जेवण कुठे मिळेल, राहण्याची व्यवस्था कुठे होईल, कोरोनाची लक्षणे दिसतायत, काय करावे, मृतदेहाची विल्हेवाट कशी-कुठे लावायची असे अनेक प्रश्न विचारत आहेत. अशाप्रकारचे कॉल आल्यानंतर संबंधित वॉर्ड अथवा विभागाशी समन्वय साधून, नोडल ऑफिसरशी संपर्क करून तक्रारी-समस्या सोडवल्या जात आहेत.























































