चेन्नईत खांबाला आदळल्याने ४ रेल्वे प्रवाशांचा मृत्यू, १० जण जखमी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । चेन्नई

धावत्या लोकलच्या दरवाजावर लोंबकळत प्रवास करणे जीवावर बेतू शकते हे माहीत असूनही प्रवासी हा धोका पत्करतात. अशीच एक घटना चेन्नई येथे घडली आहे. येथे धावत्या लोकलच्या फूटबोर्डवर उभे राहून प्रवास करताना लोहमार्गावरील खांबाला आदळल्याने चार प्रवाशांना जीव गमवावा लागला तर १० जण गंभीर जखमी झाले आहेत. हे सगळेजण फूटबोर्डवर उभे राहून दरवाजाला लोंबकळत होते.

सेंट थॉमस माऊंट येथून हे सर्व प्रवासी लोकलमध्ये चढले होते. पण गर्दी असल्याने त्यांना आत जाता आले नाही व सर्वजण फूटबोर्डवरच दाटीवाटीने उभे राहीले. यातील चारजण अक्षरशः दरवाजाला लोंबकळत होते. डब्यातही गर्दी असल्याने कोणासही आत जाता येत नव्हते. गाडीने वेग घेतला होता. रेल्वेरुळ व त्याला लागूनच उभे असलेल्या खांबामध्ये फारसे अंतर नसल्याने दरवाज्याला लटकलेले चार जण खांबाला आदळले व खाली पडले. खाली पडताना त्यांच्या बाजूला दाटीवाटीने उभे असलेल्या १० जणांनाही धक्का लागल्याने तेही खाली पडले. त्यानंतर इतर प्रवाशांनी साखळी खेचली व गाडी थांबवली. नंतर जखमींना तातडीने रुग्णालयात नेण्यात आले.

काही दिवसांपूर्वी बंगळुरू येथे घडलेल्या रेल्वे दुर्घटनेचा व्हिडीओ व्हायरल झाला होता. ज्यात धावत्या नांदेड-बंगळुरू एक्सप्रेसच्या खिडकीला लटकून एकजण स्टंट करत असताना खाली पडला व जखमी झाला होता.