परळच्या क्रिस्टल टॉवरमध्ये अग्नितांडव; 4 जण होरपळले!

सामना ऑनलाईन, मुंबई

परळच्या हिंदमाता परिसरातील क्रिस्टल टॉवरला आज सकाळी लागलेल्या भीषण आगीत 4 जणांचा मृत्यू झाला. या घटनेत 26 जण गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर के.ई.एम. रुग्णालयात उपचार सुरू आहेत. सकाळी 7.45च्या सुमारास या सतरा मजली इमारतीच्या बाराव्या आणि तेराव्या मजल्यावर ही आग लागली. यावेळी लिफ्टमध्ये दोघांचा तर जिन्यामध्ये गुदमरून दोन जणांचा मृत्यू झाला. अग्निशमन दलाच्या जवानांनी शर्थीचे प्रयत्न करून 25 जणांची सुखरूप सुटका केली.

‘क्रिस्टल’मध्ये 58 कुटुंबातील सुमारे 150 रहिवासी राहतात. मात्र आज सकाळी आग लागताच धूर आणि आगीच्या लोळांमुळे संपूर्ण इमारतीमधील रहिवाशांची धावपळ उडाली. आग इतकी भीषण होती की सोळाव्या मजल्यापर्यंत धूर आणि आगीचे लोळ पोहोचत होते. अचानक लागलेल्या आगीमुळे रहिवासी घराची गॅलरी, जिन्यावर अडकून पडले होते. आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे जवान 12 बंबांसह घटनास्थळी तातडीने दाखल झाले. अग्निशमन दलाच्या जवानांनी शर्थीचे प्रयत्न करून या सर्व रहिवाशांची सुखरूप सुटका केली. आग लागल्यानंतर सुरक्षेसाठी काही वेळातच संपूर्ण इमारत रिकामी करण्यात आली.

मृतांची नावे

  • शुभदा शिर्के      (62)
  • हसन शेख         (36)
  • अशोक संपत    (55)
  • साजीव नायर    (52)

‘एफआयआर’ दाखल करणार

‘क्रिस्टल’ इमारतीमध्ये अग्निप्रतिबंधक यंत्रणा बसवण्यात आली होती. मात्र ही यंत्रणा बंद असल्यामुळे आग आणखी भडकल्याचेही अग्निशमन दलाकडून सांगण्यात आले. यामुळे अग्निशमन दलाकडून दाखल तक्रारीवरून अब्दुल रझाक इस्माइल सुपारीवाला बिल्डरविरोधात भोईवाडा पोलीस ठाण्यात  ‘एफआयआर’ दाखल करण्यात आला आहे.

झेन ठरली देवदूत!

बाराव्या मजल्यावर आग लागली असून ती झपाटय़ाने रौद्ररूप धारण करत असल्याचे कळताच इमारतीमधील नागरिकांमध्ये प्रचंड घबराट पसरली. तेव्हा सोळाव्या मजल्यावर राहणारी झेन सदावर्ते हिने कणखर भूमिका घेतली. तिने ओरडून सर्वांना शांत राहण्याचे आवाहन केले. ‘घाबरू नका, काही होत नाही. तसेच लिफ्टमध्ये जाऊ नका’ असे सांगत ती सर्वांना 1605 क्रमांकाच्या फ्लॅटमध्ये घेऊन गेली. सर्वांना खाली बसायला लावून कॉटनचा कपडा पाण्यात बुडवून नाकावर धरण्यास सांगितले. त्याचवेळी काहींना खिडकीबाहेर कपडे फडकवून नागरिकांचे लक्ष वेधण्यास सांगितले. यावेळी तिने अग्निशमन दलाच्या नियंत्रण कक्षाला फोन करून आगीची माहिती दिली. झेनने दिलेला आत्मविश्वास आणि दाखवलेला बिनधास्तपणा अखेर सार्थकी लागला. सहावीची विद्यार्थिनी असलेली झेन सदावर्ते आज अनेकांसाठी देवदूत ठरली असे इमारतीमधील नागरिकांनी सांगितले. ‘तिसरीत असताना शाळेत डिझास्टर मॅनेजमेंट शिकवले होते. त्यानुसार मी सर्वांना सूचना करून परिस्थितीला सामोरे जाण्यास सांगत होते. त्याचा अखेर फायदा झाला’ असे झेन म्हणाली.

बिल्डरचा बेजबाबदारपणा, 58 कुटुंबे उघडय़ावर

‘क्रिस्टल’ इमारतीचा बिल्डर अब्दुल रझाक इस्माइल सुपारीवाला याच्या बेजबाबदारपणामुळेच रहिवासी या इमारतीत राहत असल्याचे अग्निशमन दलाकडून सांगण्यात आले. याबाबत न्यायालयात खटला सुरू असला तरी रहिवाशांच्या सुरक्षेसाठी इमारत रिकामी करून वीज-पाणी कापण्यात आले आहे. परिणामी 58 कुटुंबे ऐन पावसाळय़ात उघडय़ावर आली आहेत. इमारतीचे बांधकाम बेकायदेशीर असल्याने या रहिवाशांची अन्यत्र व्यवस्था करण्याची जबाबदारी पालिकेची नसल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले. त्यामुळे आता रहिवाशांसमोर जायचे कुठे, असा प्रश्न निर्माण झाला आहे.

आज लागलेल्या आगीत क्रिस्टल इमारतीची संपूर्ण इलेक्ट्रिक यंत्रणा जळून खाक झाली. त्यामुळे सर्व लिफ्टही बंद आहेत. शिवाय कायदेशीर बाबींची पुर्तता नसल्याने संबंधित इमारतीमधील सर्व फ्लॅट रिकामे करण्यात आले आहेत. मात्र ऐन पावसाळय़ात राहते घर गेल्याने निवाऱ्यासाठी वणवण करावी लागणार आहे. दरम्यान, बिल्डरने पालिकेकडे प्रॉपर्टी टॅक्स भरला नसल्यानेच इमारतीची ‘ओसी’ मिळण्यास दिरंगाई झाल्याचे समोर आले आहे, तर राहण्यास दुसरी जागा नसल्याने आपण इथे नाइलाजाने राहत असल्याचे रहिवासी सांगत आहेत.

ओसी नसताना धोकादायक वास्तव्य

‘क्रिस्टल’ ही तळमजला आणि 17 मजल्यांची इमारत पुनर्विकासातून उभारण्यात आली आहे. इमारतीला ओसी देण्यात आली होती मात्र ऑक्युपेशन सर्टिफिकेट (भोगवटा प्रमाणपत्र) देण्यात आले नव्हते. त्यामुळे इमारतीत राहत असणाऱ्या 58 सदनिकाधारकांना, मालक, विकासक आणि आर्किटेक्टला पालिकेच्या इमारत प्रस्ताव विभागाने 2016 मध्येच नोटीस बजावली होती. या संदर्भात शिंदेवाडी न्यायालयात खटला सुरू आहे.

आगप्रतिबंधक यंत्रणा बिनकामाची

‘क्रिस्टल’ इमारतीत आग प्रतिबंधक यंत्रणा होती मात्र बिनकामाची असल्यानेच आग विझवता आली नसल्याचे रहिवाशांनी सांगितले. याला सर्वस्वी बिल्डरच जबाबदार असल्याचा आरोपही रहिवाशांनी केला.

दोषींवर कारवाई होणार – महापौर

घटनेची माहिती मिळताच महापौर प्रिन्सिपल विश्वनाथ महाडेश्वर यांनी घटनास्थळी जाऊन परिस्थितीचा आढावा घेतला. या ठिकाणी बेकायदेशीर काम झाले असल्यास त्याची चौकशी करून दोषी असणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात येईल असे त्यांनी सांगितले. माणसांचा जीव धोक्यात घालणाऱ्या कुणाचीही गय केली जाणार नाही, असेही ते म्हणाले.

वीज-पाणी कापले

‘क्रिस्टल’ इमारतीला रहिवास प्रमाणपत्र नसताना रहिवासी राहत असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे या घटनेनंतर तातडीने इमारत रिकामी करण्यात आली असून वीज-पाणी कापण्यात आले आहे. या प्रकरणाची चौकशी करून अहवाल येईपर्यंत कुणालाही राहण्यास परवानगी देण्यात येणार नसल्याचे अग्निशमन अधिकाऱ्याने सांगितले.