
अमरावती शहरात मंगळवारी दुपारपर्यंत आलेल्या अहवालानुसार कोरोनाबाधितांची संख्या 182 झाली आहे. दुपारी शिवनगर परिसरातील 3 महिला आणि एका पुरुषाचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. त्यामुळे आता जिल्ह्यातील कोरोनाबाधितांची संख्या 182 वर गेली आहे.
येथील पठाणपुरा भागात राहणारा व्यक्ती नागपूर येथे गेल्यानंतर पॉझिटिव्ह आला आहे. तो खाजगी कामानिमित्त गेला असताना नागपूरातच त्याची प्रकृती बिघडली. त्यामुळे त्याला नागपूर येथे मेयो रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. यावेळी त्याचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. त्यामुळे त्याच्या संपर्कात येणार्यांचा शोध पठाणपुरा भागात घेण्यात येत आहे. अमरावती जिल्ह्यात 20 तारखेपासून कोरोनाबाधितांचा आकडा सतत वाढत आहे. 20 तारखेला सर्वाधिक 18 रुग्ण पॉझिटिव्ह आले होते. त्यानंतर 23 ला 7, 24 ला 12 तर 25 मे ला 14 रुग्णांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. मंगळवारी दुपारपर्यंत 4 जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला असून हे सर्व जण शिवनगर परिसरातील रहिवासी आहेत. यात 31 वर्षीय, 45 वर्षीय व 48 वर्षीय महिलेचा समावेश आहे. तर 31 वर्षाचा पुरुषाचा समावेश आहे. अतापर्यत 84 रूग्णांना उपचारानंतर घरी पाठविण्यात आले आहे.





























































