
परभणीत सोमवारी रात्री 11 वाजेच्या सुमारास आणखी 4 जणांना कोरोनाची लागण झाल्याची माहिती प्रशासनाने दिली. त्यामुळे जिल्ह्यात आता कोरोनाबाधितांची संख्या 86 झाली आहे. सोमवारी 24 आणि याआधी एकजण असे एकूण 25 रुग्ण कोरोनामुक्त झाल्याची माहिती देण्यात आली. तर आतापर्यंत जिल्ह्यात कोरोनामुळे दोघांचा मृत्यू झाला आहे. त्या दोन्ही व्यक्ती जिंतूर तालुक्यातील आहेत.
सोमवारी रात्री उशिरा आलेल्या अहवालात जिंतूर तालुक्यातील डोंगरतळा येथील एक 25 वर्षीय तरुणी, मानवत शहरातील 22 वर्षांचे दोन तरुण व एक 23 वर्षीय महिला अशा एकूण 4 जणांचा समावेश कोरोनाबाधितांमध्ये झाला आहे. आहे. हे सर्व रुग्ण मुंबईहून आलेले आहेत. सेलू तालुक्यातील ब्रह्मवाकडी येथे दोन, चिकलठाणा (बु.) आणि देवगावफाटा येथील प्रत्येकी एक अशा चार कोरोनाबाधित रुग्णांवर उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. तर त्यांच्या संपर्कातील 31 जणांना शासकीय वसतीगृहातील विलगीकरण कक्षात ठेवले आहे. त्यापैकी 17 जणांचे अहवाल निगेटिव्ह आले. चिकलठाणा (बु.)येथील चार आणि गोसावी पिंपळगाव येथील एक अशा पाच जणांचा अहवाल दुसऱ्यांदा निगेटिव्ह आल्याने त्यांना विलगीकरण कक्षातून सुटी दिली आहे.

























































