नगरमध्ये रस्ता अडवून प्रवाशांना लुटणाऱ्या 4 आरोपींना मुद्देमालासह अटक

नगरमध्ये रस्ता अडवून प्रवाशांना लुटणार्‍या 4 आरोपींना मुद्देमालासह स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली आहे. आरोपींकडून 15 हजार रोख रक्कम व 31 हजार किंमतीचे दोन सॅमसंग व एक विवो कंपनीचा मोबाईल जप्त करण्यात आला आहे. आरोपींमध्ये अक्षय रजनीकांत मकासरे (वय 23, रा.भानसहिवरा, ता.नेवासा,जि.नगर), तुषार बाबासाहेब निंपुंगे, सागर एकनाथ वंजारे, राहूल मछिंद्र साळवे यांचा समावेश आहे.

21 जानेवारी रोजी किरण अण्णासाहेब जाधव बचतगटाच्या कर्जाची रक्कम 2 लाख 785 रुपये बँकेत जमा करण्यासाठी जात असताना त्यांना महत्त्वाचा फोन आल्याने त्यांनी मोटारसायकलचा वेग कमी केला आणि फोनवर बोलत होते. त्यावेळी भानसहिवराकडून मोटारसायकलवर तीनजण आले. त्यांनी जाधव यांना चाकूचा धाक दाखवत त्यांच्याकडील पैशाची बॅग बळजबरीने हिसकावून नेली. त्यानंतर त्यांनी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. या गुन्हयाचा तपास स्थानिक गुन्हे शाखेच्या पथक करत होते. तपासात आरोपींची माहिती मिळाल्याने सातारा जिल्हयात पथकाने जाऊन अक्षय मकासरे याला ताब्यात घेऊन चौकशी केली. त्याने साथीदारांसह गुन्हा केल्याची कबुली दिली आहे. गुन्हयातील रोख रकमेबाबत विचारपूस केली असता त्यांनी रोख रक्कम आपसापसात वाटून घेतल्याचे सांगितले. त्या पैशांनी तीन मोबाईल विकत घेतल्याचे सांगितले. त्यांच्याकडून 15 हजार रुपये रोख रक्कम व 31 हजार रुपये किेंमतीचे दोन सॅमसंग व एक विवो कंपनीचा मोबाईल व गुन्हयात वापरलेली एक 40 हजार रुपये किंमतीची एक प्लॅटीना कंपनीची काळे रंगाची मोटार सायकल असा एकूण अंदाजे 86 हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे. याप्रकरणी पोलीस पुढील तपास करत आहे. ही कारवाई पोलीस अधीक्षक सागर पाटील, शेवगांवचे उपविभागीय पोलीस अधिकारी मंदार जावळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांच्या पथकाने केली आहे.

आपली प्रतिक्रिया द्या