कल्याणमध्ये तीन भटक्या कुत्र्यांनी तोडले चिमुकल्याचे लचके, रहिवाशांमध्ये घबराट

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

 

डोंबिवली शहरात भटक्या कुत्र्यांची जबरदस्त दहशत पसरली असून कल्याणच्या द्वारली गावात चार वर्षांच्या चिमुकल्यावर तीन कुत्र्यांनी हल्ला केला. 18 ठिकाणी त्याचे लचके तोडले असून या चिमुकल्याला जखमी अवस्थेत कळवा रुग्णालयात दाखल केले आहे. तुषार निंबोरे असे या चिमुकल्याचे नाव असून दक्ष नागरिकांमुळे त्याची भटक्या कुत्र्यांच्या तावडीतून कशीबशी सुटका झाली.

सुहास निंबोरे हे आपल्या कुटुंबासह द्वारली गावातील आदित्य अपार्टमेंटमध्ये राहतात. शनिवारी सायंकाळच्या सुमारास त्यांचा 4 वर्षांचा मुलगा  तुषार हा इमारतीच्या मागील बाजूस असलेल्या  परिसरात  खेळत होता. याचदरम्यान तीन ते चार भटक्या कुत्र्यांनी तुषारच्या दिशेने धाव घेतली आणि त्याच्यावर हल्ला केला. तुषार या घटनेने घाबरला आणि त्याने आरडाओरडा सुरू केला. यावेळी आजूबाजूच्या नागरिकांनी प्रसंगावधान राखत तत्काळ तुषारच्या दिशेने धाव घेत या कुत्र्यांच्या तावडीतून त्याची सुटका केली. तोपर्यंत या भटक्या कुत्र्यांनी त्याच्या शरीरावर 18 ठिकाणी चावा घेतला होता.

 

दरम्यान, कल्याण -डोंबिवली महापालिका क्षेत्रात भटक्या कुत्र्यांची संख्या कमालीची वाढली आहे. रात्री अपरात्री ये जा करणाऱ्या नागरिकांना हे कुत्रे लक्ष्य करत आहेत.

9 महिन्यांत 9 हजार जणांना चावा

गेल्या नऊ महिन्यांत 9 हजार 44 जणांचा चावा या कुत्र्यांनी घेतला आहे. म्हणजेच एका महिन्यात सुमारे हजार नागरिकांना कुत्रे लक्ष्य करत असल्याने या भटक्या कुत्र्यांची दहशत वाढत चालली आहे. या कुत्र्यांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.