
प्लास्टिक हे पर्यावरणाला घातक आहे, त्याचा फटका हा नागरिकांना तसेच प्राण्यांनाही बसतो. प्लास्टिक कचऱ्याच्या ढिगाऱ्याची मोठी समस्या अनेक शहरांसमोर उभी आहे. प्लास्टिकच्या या समस्येवर मात करण्यासाठी रिलायन्स इंडस्ट्रीज महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. रिलायन्स इंडस्ट्रीजने लोकांनी वापरून टाकलेल्या प्लास्टिकचा रस्ता बांधण्यासाठी उपयोग करून 40 किमीचा रस्ता हा प्रायोगिक तत्वावर बनवला आहे. त्यांचा हा प्रयोग यशस्वी झाला असून सरकारने असा प्लास्टिक रस्त्या बांधणीसाठी प्रोत्साहन द्यावे यासाठी पाठपुरावा करणार असल्याचे रिलायन्स पेट्रोकेमिकल बिझनेसचे सीओओ विपुल शहा यांनी सांगितले.
प्लास्टिकचा प्रश्न हा दिवसेंदिवस गंभीर होत आहे. खाद्यपदार्थ, चैनीच्या वस्तू, कॉस्मेटिक यामध्ये प्लास्टिकचा वापर केलेला असतो. या वस्तू वापरून झाल्यानंतर प्लास्टिक कचऱ्यात फेकून दिले जाते. कचऱ्यातील टाकलेले प्लास्टिक पिशव्या मोकाट जनावरे खातात. त्याचा त्यांना त्रास होतो. तर पर्यावरणाचीही प्लास्टिकमुळे हानी होत आहे. लोकांनी वापरून फेकून दिलेल्या प्लास्टिकपासून रस्ता बनविण्याची संकल्पना कंपनी व्यवस्थापनाने अंमलात आणायचा निर्णय घेतला. कंपनीने वेफर्स, खाद्यपदार्थ पॅकिंग, फिल्म्सचे प्लास्टिक, पॉलिथिन पिशव्या, ई-कॉमर्स वापरातील मटेरियल, कचऱ्याच्या पिशव्या, इतर प्लास्टिक वस्तू यांचे बारीक तुकडे करून ते खडी आणि डांबर यामध्ये मिसळून रस्त्यासाठी वापरण्यात आले आहेत. नागोठणे येथील रिलायन्स इंडस्ट्रीज कंपनीच्या परिसरातील 40 किमीचे रस्ते 50 टन टाकाऊ प्लास्टिक वापरून तयार करण्यात आले आहेत. मे 2019 रोजी रस्त्याच्या बांधकामास सुरुवात करून दोन महिन्यात ते पूर्ण केले. जिल्ह्यात यावर्षी सरासरीपेक्षा जास्त पाऊस पडून अनेक ठिकाणचे रस्ते खड्डेमय झाले. मात्र, नागोठणे येथे अडीच हजार मिमी पाऊस पडूनही कंपनीने प्लास्टिकपासून बनविलेल्या रस्याला एकही खड्डा पडलेला नाही. डांबरापासून बनविलेल्या रस्त्यापेक्षा टाकाऊ प्लास्टिकपासून बनविलेल्या एक किलोमीटर रस्त्याचा खर्चात एक लाखांची बचत होते, असे शहा यांनी सांगितले. रिलायन्स कंपनीने बनविलेल्या रस्त्याच्या कामासाठी बहुतांश प्लास्टिक हे कर्मचाऱ्यांच्या वसाहती मधून गोळा केले आहे.
रिलायन्स कंपनीने तयार केलेले टाकाऊ रस्त्याचे हे मॉडेल सामाजिक बांधिलकीतून ग्रामीण भागातही तयार करण्यासाठी शासनासमोर मांडण्यासाठी प्रयत्न कंपनी प्रशासन करणार आहे. रस्त्याच्या साहित्यात प्लास्टिकचा वापर केल्याने रस्त्याची क्षमता आणि टिकाऊपणा वाढला आहे. तसेच हा रस्ता पर्यावरणपूरक असल्याने रस्त्याचा दर्जाही वाढला आहे. त्यामुळे भविष्यात रायगडसह देशातील रस्ते हे टाकाऊ प्लास्टिकपासून बनवण्यासाठी कंपनी प्रयत्न करणार आहे.

























































