
सामना प्रतिनिधी । मालवण
बांदीवडे मळावाडी नजीक सय्यद जुवा येथील सदानंद मारुती हडकर या शेतकऱ्याच्या भाताच्या दोन गंजीना सोमवारी दुपारी आग लागली. या आगीत सुमारे ४० हजार रुपयांचे नुकसान झाले आहे. आगीचे वृत्त समजताच ग्रामस्थानी घटनास्थळी धाव घेत आग विझवण्याचा प्रयत्न केला. परंतु जोरदार वाऱ्यामुळे आगीवर नियंत्रण मिळविणे अवघड झाले.
आग विझवण्यासाठी दहेश बांदिवडेकर,बबलु मिठबावकर, मंगेश मुणगेकर, हिरेश मुणगेकर, बाळा हडकर, संतोष मयेकर, शाहिंद सैय्यद, बाबा सैय्यद, यासिन सय्यद, आशिष चेंदवनकर, इस्माईल शेख, निशु मुणगेकर, शुभम चव्हाण, शंकर बांदिवडेकर तसेच बांदिवडे ग्रामस्थ सहभागी झाले होते. चालू हंगामात भात पीक कमी आले असताना पिकवलेल्या धान्याचे आगीत नुकसान झाल्याने शासनाने नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी हडकर यांनी केली आहे. नुकसानीचा पंचनामा मरडे तलाठी धनंजय सावंत यांनी केला.

























































